मुंबई नगरी टीम
मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत पुन्हा एकदा विजय झाला.या निवडणुकीत ३४ पैकी ३१ जणांनी मतदान केले.त्यात २९ मते शरद पवार यांना,तर आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांना केवळ २ मते मिळाली आहे. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची निवडणूक राजकीय आखाडा बनल्याचा आरोप विरोधकांना केला आहे.
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या निवडणुकीत ७ उपाध्यक्ष निवडले गेले आहेत.त्यामध्ये मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ भालचंद्र मुणगेकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार विद्या चव्हाण, नामवंत वास्तुविशारद शशी प्रभू, निवृत्त न्यायाधीश अरविंद सावंत, प्रदीप कर्णिक,जनता दलाचे मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर, अमला नेवाळकर यांचा समावेश आहे.संतोष कदम,रजनी जाधव, आनंद प्रभू, प्रमोद खानोलकर, झुंजार पाटील, संजय भिडे आणि सुधिर सावंत यांचा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला.ऐतिहासिक ओळख असलेल्या आणि सामाजिक,सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाच्या दादर-नायगाव येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या निवडणुकीबाबात मोठे आरोप झाले होते. कार्यकारी मंडळाच्या १५ जागांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली.
निवडणूक पार पडल्यानंतर धनंजय शिंदे यांनी ही निवडणूक लोकशाही मार्गाने झाली नसल्याचा आरोप केला. न्यायालयात जाणार असल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे निवडणूक लोकशाही मार्गानेच झाल्याचा दावा निवडणूक निर्णय अधिकारी किरण सोनवणे यांनी केला.माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गलगली यांच्या मते संस्थेच्या घटनेच्याप्रमाणे ६ हजार पेक्षा अधिक मतदार असताना जाणूनबुजून ३४ मतदारांना मतदानाचा अधिकार देण्यात आला.