ड्रग्ज प्रकरणात ट्विस्ट : मविआच्या नेत्यांनी सरकारकडे केली महत्वाची मागणी

मुंबई नगरी टीम

मुंबई । आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणात नव्या पुराव्यामुळे एनसीबीच्या कारवाईवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप प्रभाकर साईल याने केला आहे.या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले असून राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

पटोले म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून विशेषतः राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून केंद्र सरकारच्या एजन्सींचा गैरवापर प्रचंड प्रमाणात सुरु आहे. ईडी, सीबीआय इन्कम टॅक्स यांचा वापर करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करून महाराष्ट्राची बदनामी करण्याचा एक सुनियोजीत कट असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांतील एनसीबीच्या कारवाया पाहिल्यावर त्या सुद्धा याच कटाचा भाग आहेत, अशी शंका लोकांच्या मनात निर्माण झाली आहे.एनसीबीकडून गेल्या काही दिवसांत सातत्याने बॉलिवूडमधील मंडळींना टार्गेट करून कारवाया केल्याचा आरोपही केला जातो आहे. एनसीबीने मोठा गाजा वाजा करून क्रुझवरील ड्रग पार्टीचा पर्दाफाश केला. बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानच्या मुलाला एनसीबीने या प्रकऱणी अटकही केली. मात्र त्यानंतर या प्रकरणात अनेक नवे पुरावे समोर आले आहेत. आर्यन खानला एनसीबी कार्यालयात घेऊन जाणारा किरण गोसावी हा गुन्हेगार आणि मनिष भानुशाली हा भाजपचा पदाधिकारी असल्याचे समोर आले होते. त्यानंतर या प्रकरणातील साक्षीदार आणि स्वतंत्र पंच प्रभाकर सैल याने प्रतिज्ञापत्र आणि व्हिडीओ जारी करून हे प्रकरण दाबण्यासाठी शाहरूख खानकडे २५ कोटी रूपये मागितले होते पण १८ कोटी रूपयात सौदा पक्का झाला होता असा गौप्यस्फोट केला आहे. तसेच एनसीबी अधिका-यांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचेही म्हटले आहे. त्याने केलेले आरोप अत्यंत गंभीर असून एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहेत. त्यामुळे राज्य सरकारने याची तात्काळ दखल घेऊन उच्चस्तरीय समितीमार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी पटोले यांनी केली आहे.

बरं झालं लोकांच्या समोर खरी वस्तुस्थिती यायला लागलीय : जयंत पाटील

बरं झालं लोकांच्या समोर खरी वस्तुस्थिती यायला लागलीय अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी क्रुझ ड्रग्ज पार्टी आणि एनसीबी कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे.भाजपचे केंद्र सरकार आपल्या एजन्सींचा दुरुपयोग करतेय, लोकांकडून पैसे उकळण्याचे काम करतेय हे आज टिव्हीवर ऐकल्यावर व पाहिल्यावर लक्षात येते आहे असेही जयंत पाटील म्हणाले.आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली होती त्यांना पकडून नेण्यात भाजपचे लोक पुढे होते. त्यानंतर अशी पैशाची मागणी होत असेल तर बरेच लोक यामध्ये सहभागी असण्याची शक्यता जयंत पाटील यांनी बोलून दाखवली आहे.

या आरोपांचा तपास महाराष्ट्र पोलिसांनी स्वत:हून दखल घेऊन करावा : संजय राऊत

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून नेमण्यात आलेले पंच प्रभाकर साईल यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.या आरोपांचा तपास महाराष्ट्र पोलिसांनी स्वत:हून दखल घेऊन करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.यात महाराष्ट्राला बदनाम केले जात आहे. मुंबईचे पोलीस देखील अंमली पदार्थ पकडत आहेत. पण हे दोन ग्रॅम, अर्धा ग्रॅम, पाव ग्रॅम पकडतायत आणि महाराष्ट्राला बदनाम करतायत.त्यामुळे आजच्या माहितीसंदर्भात तात्काळ कठोर कारवाई व्हायला हवी, असे राऊत म्हणाले.

Previous articleमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या आईंना कोरोनाची लागण
Next articleअध्यक्षपदाच्या निवडणुकीत शरद पवारांचा दणदणीत विजय; विरोधकाला मिळाली केवळ २ मते