मुंबई नगरी टीम
मुंबई। संपकऱ्यांचे नेते सदाशिव खोत व भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपातून माघार घेत असल्याचे आझाद मैदानात जाहीर केले. सरकारने घसघशीत पगारवाढ जाहीर करुन आज अवघे १३६२ कर्मचारी कामावर हजर झाले. अजूनही ९० टक्के कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असून सरकारने संपकरी कर्मचाऱ्यांना कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
परिवहन मंत्री अॅड. अनिल परब म्हणाले, पगारवाढ देऊनही कर्मचारी कामावर येण्यास तयार नाहीत. आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत किती कामगार कामावर आले किती नाही, याचा अभ्यास करु, त्यानंतर महामंडळ कठोर कारवास प्रारंभ करेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. विलीनीकरणाची मागणी न्यायालयाने नेमलेल्या समितीसमोर आहे. त्याला १२ आठवड्याचा कालावधी आहे. संप लांबवणे परवडणार नाही, तरी कर्मचाऱ्यांनी कामावर यावे, असे आवाहन अॅड. परब यांनी केले.आज राज्यभरात एकुण ९ हजार ७०५ कर्मचारी कामावर हजर होते. बुधवारी हजर कर्मचाऱ्यांची संख्या ८ हजार ३४३ होती. त्यात ३९८ चालक आणि २४० वाहक होते. म्हणजे पगारवाढ देऊनही आज अवघे १ हजार ३६२ कर्मचारी कामावर आले. सरकारने दिलेली पगारवाढ संपकऱ्यांनी ठाम फेटाळून लावली असून विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम असल्याचे आज स्पष्ट झाले.
कर्मचाऱ्यांचे नेते व रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाशिव खोत म्हणाले आझाद मैदानात कर्मचाऱ्यांना संबोधीत करताना म्हणाले, ‘एसटी कर्मचाऱ्यांना चांगली वेतनवाढ मिळाली आहे. विलिनीकरणाचा मुद्दा न्यायालयात आहे. पहिल्या टप्प्यात मिळालेले यश मोठे आहे, असा दावा त्यांनी केला. एसटी संप आम्ही चिघळवला असल्याचा आरोप निराधार असल्याचे भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले. तसेच संप मागे घेण्याचे आवाहन या दोघा नेत्यांनी केले.या दोघा नेत्यांच्या आवाहनानंतरही कर्मचारी संपावर ठाम आहेत. एसटी संघटनेचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी सदाशिव खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर संपातून माघार घेतल्याबद्दल टीकास्त्र सोडले. ‘या दोघांना एसटी आंदोलनातून आम्ही आझाद करत आहोत’, असे अॅड. सदावर्ते म्हणाले. संप लांबवून एसटी कामगारांना गिरणी कामगार करायचे आहे का, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज केला.
भाजपने एसटी संप चिघळवला असल्याचा दावा अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला. आज राज्यात एकुण ९९ मार्गावर ३४७ बस धावल्या. त्यातून ८ हजार ९४० प्रवाशांनी प्रवास केला. आतापर्यंत ३ हजार ५२ कर्मचाऱ्यांना महामंडळाने निलंबीत केले आहे. तर ६४५ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या आहेत.कारवाई करण्यात आलेले कर्मचारी जर उद्या रात्रीपर्यंत कामावर परतले तर त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्याचे सरकारने जाहीर केले आहे. एकुण, एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा नेते व संघटनांच्या हातून निसटला असून एसटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य अधांतरी बनले आहे.