एकदाचं ठरलं ! हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती, तिजोरीत खडखडाट आणि मुख्यमंत्र्यांचे आजारपण या सर्व पार्श्वभूमीवर ७ डिसेंबरपासून नागपूर येथे प्रस्तावित असलेले हिवाळी अधिवेशन अखेर मुंबईतच घेण्यावर मंत्रिमंडळाने आज शिक्कामोर्तब केले. डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात २२ ते २९ डिसेंबर या कालावधीत हे अधिवेशन होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार असून, त्या बैठकीतच तारीख निश्चित होईल.

युरोपीयन देशात कोरोनाच्या आलेल्या लाटा पाहता भारतात तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढील महिन्यात नागपुरात होणारे नियोजित हिवाळी अधिवेशन मुंबईतच व्हावे अशी भूमिका घेतली होती. दुसरीकडे, तिजोरीत खडखडाट असताना शंभर- दोनशे कोटी खर्च करून कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास नागपूरला अधिवेशन घेता येणार नाही. जरी अधिवेशन घेतले तरी धोकादायक ठरेल, असा प्रशासनाचा दावा होता.यंदाच्या राज्य सरकारच्या महसूलात २० ते ३० टक्के घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यंदाचे हिवाळी अधिवेशन मुंबईतच घेण्यास अर्थमंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही पसंती दिली होती. मात्र हे अधिवेशन नागपूरलाच घेतले जावे अशी काँग्रेसची भूमिका होती. परंतु काँग्रेसच्या विरोधाला डावलून व सर्व बाबींचा विचार करून सात ते आठ दिवसाचे मुंबईतच अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात अत्याचार व पीडीत महिलांना न्याय देणारे बहुचर्चित शक्ती कायद्याचे विधेयक मंजूर केले जाणार आहे.

विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची (बीएसी) बैठक ऑक्टोबर महिन्यातच होणे अपेक्षित होते. विधीमंडळ प्रशासनाने याबाबतची नस्ती मुख्यमंत्री कार्यालयात ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात पाठवली होती. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या नस्तीवर स्वाक्षरी न केल्याने यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात नव्हे तर मुंबईतच होईल असे बोलले जात होते.भाजप व काँग्रेस हे नागपुरात अधिवेशन होण्याबाबत आग्रही आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांवर नुकतीच मोठी शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे त्यांना विमानप्रवास झेपणार नाही. परिणामी, काँग्रेस व भाजपचा विरोध मोडून पडला आहे.

Previous articleएसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम तर पगारवाढीनंतर १३६२ कर्मचारी कामावर
Next article२३ वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता ‘त्या’…मलिकांचा राणेंना टोला