१ डिसेंबरपासून १ ते ४ थी तर शहरी भागातील १ ते ७ वीच्या शाळा सुरू होणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । येत्या एक डिसेंबरपासून राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या सरसकट शाळांचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यास राज्य मंत्रिमंडळाने संमती दिली असल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली.कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी नेमकी काय खबरदारी घ्यावी याची नियमावली लवकरच जाहीर केली जाईल. कोरोनाचा काळ असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य दिले जाईल असेही शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.

कोरोना महामारीमुळे गेल्या पावणे दोन वर्षापासून शाळा बंद आहेत. दुसरी लाट उतरंडीला लागल्यानंतर मागील महिन्यात शहरी भागातील आठवी ते बारावी तर ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी शाळांचे प्रत्यक्ष वर्ग सुरु करण्यात आले होते. दिवाळीनंतर कोरोना रुग्णसंख्येचा आलेख घसरता राहिल्याने बालकांच्या कोरोना कृती दलाने पहिलीपासूनचे शाळांचे वर्ग सुरु करण्यास हिरवा कंदिल दाखवला होता.आरोग्य विभागानेही याला होकार दिल्यानंतर शालेय विभागाने पहिली ते बारावीचे सर्व वर्ग सुरु करण्याबाबचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर केला. यावेळी कृती दलाचे म्हणणे आणि आरोग्य विभागाने केलेल्या सादरीकरणानंतर पहिलीपासून सर्व शाळांचे वर्ग सुरु करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यानुसार येत्या एक डिसेंबरपासून राज्यातील सर्व शाळा सुरू होणार आहेत.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या निर्णयाची माहिती देताना शिक्षणमंत्री गायकवाड म्हणाल्या की, कोरोनाची सद्यस्थिती, यापुढील काळातील संसर्ग वाढीचा वेग, त्याचे परिणाम आणि शाळा भरल्यानंतरचा परिणाम, याचा साकल्याने विचार करून शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शाळा सुरु करण्याची मागणी सर्वच स्तरातून होत होती. शाळा उघडण्याची सुनिश्चित पद्धती चार- पाच दिवसात जारी केली जाईल, असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.शाळा सुरु करण्याचा निर्णय पूर्वीच होणार होता. मात्र मुख्यमंत्र्यांचा रुग्णालयातील डिस्चार्ज लांबला. त्यामुळे निर्णयास विलंब झाला. आता शाळांना तयारीसाठी अवघे ५ दिवस आहेत.राज्यात १ ते ७ वी या इयत्तेत १ कोटी ३४ लाख ८५ हजार ८७९ विद्यार्थी आहेत. तर प्राथमिकचे ३ लाख २९ हजार ९६४ शिक्षक आहेत. ग्रामीण भागात ५ वी पासूनचे वर्ग चालु आहेत. मात्र आजच्या सरकारच्या निर्णयाने किमान १ कोटी विद्यार्थी संख्येला मोठा दिलासा मिळाला आहे.

Previous articleमुख्यमंत्र्यांनी रूग्णालयातून साधला मंत्र्यांशी संपर्क;धन्यवाद देतानाच प्रकृतीची दिली माहिती
Next articleएसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम तर पगारवाढीनंतर १३६२ कर्मचारी कामावर