मुख्यमंत्र्यांनी रूग्णालयातून साधला मंत्र्यांशी संपर्क;धन्यवाद देतानाच प्रकृतीची दिली माहिती

मुंबई नगरी टीम

मुंबई । १० नोव्हेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मानेचे दुखणे बळावल्याने त्यांना एच.एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर १५ दिवसाच्या कालावधीनंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला त्यांनी रुग्णालयातून ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावली.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मानेच्या दुखण्यावरील उपचारासाठी गेल्या बुधवारी १० नोव्हेंबर रोजी रात्री एच.एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले.याविषयीची माहिती त्यांनी स्वतः दिली होती. दोन-तीन दिवस रुग्णालयातच राहून उपचार घेणार असल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर स्पाईन सर्जरी करण्यात आली.त्यांची प्रकृती उत्तम आणि स्थिर आहे. सध्या एचएन रिलायन्स रुग्णालयात त्यांची फिजिओथेरपी सुरू आहे. त्यांना योग्यवेळी डिस्चार्ज देण्यात येईल असे रुग्णालयाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला मुख्यमंत्री ठाकरे यांनी एच.एन.रिलायन्स रुग्णालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.बैठकीच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या. ते म्हणाले की, या आजारपणात आपण सर्व जण सहकार्य करीत आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद.शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली फिजीओथेरपी व्यवस्थित सुरू आहे असेही ते म्हणाले.

यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत कोविड परिस्थिती, लसीकरण, पीक पाणी परिस्थिती आदी विषयांवर चर्चा झाली. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी संपासंदर्भात राज्य शासनाने उचललेल्या पावलांची माहिती मंत्रीमंडळास दिली.कोविड परिस्थिती युरोपमध्ये बिकट होत असून आपण देखील महाराष्ट्रात पुरेशी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे, कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांत लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच चाचण्या वाढवाव्यात.कोविडचा धोका पूर्णपणे गेलेला नाही त्यामुळे आरोग्याचे नियम पाळण्यासाठी सर्वानी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत यावर चर्चा झाली.

Previous articleसमीर वानखेडे यांनी आईच्या मृत्यूनंतरही केला फर्जीवाडा : मलिकांचा गंभीर आरोप
Next article१ डिसेंबरपासून १ ते ४ थी तर शहरी भागातील १ ते ७ वीच्या शाळा सुरू होणार