मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्यातील कोरोनाचे संकट कमी होत असल्याचे चित्र असले तरी ओमायक्रॅान या नव्या संकटामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा कशा होणार याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चर्चा सुरू असताना दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रकाची घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज केला.बारावीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान तर दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल दरम्यान पूर्वी प्रमाणे ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.
इ.१२वी लेखीपरीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ यादरम्यान तर,इ.१०वी लेखीपरीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ याकालावधीत प्रचलित पद्धतीने(ऑफलाईन) होतील.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच अभ्यासक्रमात २५ % कपात करण्यात आली आहे.उर्वरित अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नच परीक्षेत विचारले जातील. pic.twitter.com/i0wbWBE9H5
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) December 16, 2021
गेल्या दीड वर्षापासून राज्यात सुरू असलेल्या कोरोना संकटामुळे शाळा या ऑनलाईन पद्धतीने सुरू होत्या.कोरोनामुळे या परीक्षांचे स्वरूप आणि मूल्यमापनाच्या पद्धतीत बदल करण्यात आला होता.मात्र गेल्या महिन्यांपासून राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. राज्य सरकारने निर्बंध मोठ्या प्रमाणात हटवले आहेत. शिवाय राज्यातील शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यात ओमायक्रॅानचे नवे संकट घोंघावत असल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या कशा घेणार यावर पालक आणि विद्यार्थ्यामध्ये चर्चा सुरू असतानाच आज राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान तर दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल दरम्यान पूर्वी प्रमाणे ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.प्रात्याक्षिक आणि तोंडी परीक्षांचेही वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.दहावीची प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा २५ फेब्रूवारी ते १४ मार्च दरम्यान तर बारावीची प्रात्यक्षिक आणि तोंडी या १४ फेब्रूवारी ते ३ मार्च दरम्यान घेण्यात येणार आहे.
यापूर्वी ज्या पद्धतीने परीक्षा घेतल्या जात होत्या त्या प्रमाणे यंदाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने बोर्डाच्या माध्यमातून घेण्यात येणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.तर १२ वीचा निकाल जून २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तर १०वीचा निकाल जुलै २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लावण्यात येईल, असे गायकवाड यांनी सांगितले.