मुंबई नगरी टीम
मुंबई । गेल्या दोन दिवासात राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याने राज्याच्या चिंतेत भर पडली आहेत.कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच राज्यातील ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे.या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून काल झालेल्या टास्क फोर्स आणि आरोग्य विभाग बैठकीनंतर राज्यात निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.काल मध्यरात्री राज्य सरकारने यासंदर्भातील नियमावली जारी केली आहे.
त्यानुसार राज्यात सांस्कृतिक,धार्मिक,राजकीय कार्यक्रम आणि लग्नसोहळ्याला फक्त ५० लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.तर अंत्यसंस्कारासाठी २० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.या नियमांची अंमलबजावणी आजपासून करण्यात येणार आहे. ३१ डिसेंबरला होणारी गर्दी लक्षात घेता पर्यटनस्थळावर जमावबंदी लागू कऱण्यात आली आहे. तसेच स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा देण्यात आली आहे.कोरोनाबाबत आधीचे निर्बंधही कायम राहतील असेही काल मध्यरात्री जारी करण्यात आलेल्या नियमावलीत म्हटले आहे. काल राज्यात तब्बल ५ हजार ३६८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर २२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.राज्यात काल एकूण १९८ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. राज्यात आतापर्यंत ४५० ओमायक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे.ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे.त्यातच मुंबईसह राज्यात पुन्हा कोरोनाबाधितांची वाढ होऊ लागली असल्याने राज्य पुन्हा एकदा टाळेबंदीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे चित्र आहे.
काय आहेत नवे निर्बंध ?
सांस्कृतिक,धार्मिक तसेच राजकीय कार्यक्रम आणि लग्नसोहळे यांना फक्त ५० लोकांनाच उपस्थित राहता येणार,अंत्यसंस्कारासाठी केवळ २० लोकांना उपस्थिती राहता येणार,राज्यातील पर्यटनस्थळावर जमावबंदी आदेश जारी,कोरोनाबाबत आधीचे निर्बंधही कायम असतील.