मुंबई नगरी टीम
मुंबई । माझ्या विरोधातील कारवाई ही सूडबुध्दीने करण्यात येत आहे. सहकार विभागाचे दरवर्षी इन्स्पेक्शन होत असते,मग त्यावेळी राज्य सरकार व सहकार विभाग झोपले होते काय.सहकार विभागाचे जेव्हा ऑडिट होते त्यावेळी सहकार विभाग काय करते होते. पण आता ते केवळ सूडाने कारवाई करीत असले तरीही मी या विरोधात संघर्ष करणार आहे व या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची स्पष्ट भूमिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज मांडली.
सहकार विभागाने दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरविले आहे. त्यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, मी विरोधी पक्षनेता आहे आणि सरकारला ज्या पद्धतीने विविध विषयांवर मी जाब विचारतोय त्याचा पोटशूळ सरकारला आहे. त्याचबरोबर काही हितशत्रू प्रसारमाध्यमांचा आधार घेत वैयक्तिक टार्गेट करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. एक राजकीय पक्षाचा पदाधिकारी, एक पत्रकार आणि सरकारी यंत्रणा असे सिंडिकेट करुन प्रविण दरेकरला दाबता येईल का? बदनाम करता येईल का, असा हा नियोजनबद्ध कार्यक्रम आहे. त्यांच्या कार्यक्रमाला मी भीक घालत नाही. कारण माझा विश्वास मुंबईकरांवर आहे. सहकारी कार्यकर्त्यांवर विश्वास आहे असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
दरेकर पुढे म्हणाले, मुंबई बँकेच्या निवडणुकीत १७ उमेदवार माझ्या नेतृत्वाखाली बिनविरोध विजयी झाले. तर चार जागांसाठीच्या झालेल्या निवडणूकीतही माझ्या नेतृत्वाखाली चारही जागा सहकार पॅनेलच्या आल्या. माझ्या नेतृत्वाखाली २१च्या २१ जागा आल्या. पण आता वर्तमानपत्रांच्या हेडलाईन होत आहेत. काही राजकीय पुढारी माझ्या नावाने, बँकेच्या नावाने शिमगा करतायत. पण माझ्यावर लोकांचा विश्वास आहे, सभासदांचा विश्वास आहे, ग्राहकांचा विश्वास आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.काहीच मिळत नाही तर कुठून तरी जाऊन वॉर्ड ऑफिसरकडे जाऊन बसायचे. तुम्ही नोटीस पाठवली का हे विचारायचे. सहकार मंत्र्यांचे पीए संतोष पाटील यांच्याकडे जाऊन दबाव आणायचा. सीएम ऑफिसला जायचे.पत्रकार,शासकीय अधिकारी,सरकार आणि राजकीय पक्षाचा नेता या चौघांचे सिंडिकेट माझ्याविरोधात काम करत विरोधी पक्षनेता म्हणून आकसापोटी हे सर्व सुरु असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला.