मुंबई नगरी टीम
बीड । भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याच नेतृत्वाचे वर्चस्व जिल्हयात अबाधित असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.आष्टी, पाटोदा आणि शिरूर या नगरपंचायतीत सर्वाधिक जागा जिंकून भाजप सत्तेवर आला आहे.या निकालाने पालकमंत्र्यांना ‘जोर का झटका’ बसला आहे. दरम्यान, नगरपंचायत चुनाव एक झांकी है, जि.प.,पं.स. अभी बाकी है असं सांगत इथून पुढंच्या काळात भाजपला आणखीन मोठं यश मिळेल अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
बीड जिल्हयातील नगरपंचायत निवडणूकांचे निकाल आज जाहीर झाले, त्यात आष्टी,पाटोदा व शिरूर या तिन्हीवर भाजप झेंडा फडकला आहे.आष्टीत १७ जागांपैकी भाजप १०, अपक्ष ४, राष्ट्रवादी काँग्रेस २, कॅाग्रेस १, पाटोदा- भाजप ९, अपक्ष ६, राष्ट्रवादी काँग्रेस २, शिरूर – भाजप ११, राष्ट्रवादी काँग्रेस ४, तर शिवसेनेला २ जागा मिळाल्या आहेत.दीनदयाळ बॅकेच्या विजयानंतर या निकालाने पंकजा मुंडे यांचे नेतृत्वाचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पालकमंत्र्यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती परंतु जनतेने त्यांना साफ नाकारत पराभवाचा झटका दिला असल्याची चर्चा आहे. नगरपंचायतीचा निकाल लोकांचा जनादेश असून हा विजय संपूर्णपणे जिल्हयातील जनतेचा आहे, त्याबद्दल सर्व जनता आणि परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांचे मी आभार मानते अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली. प्रत्येक निवडणूक पुढच्या निवडणुकीची पायाभरणीच असते. भविष्यातील निवडणूकीची काय दिशा असेल हे या निकालाने स्पष्ट झाले आहे. ‘नगरपंचायत एक झांकी है, जि.प.,पं.स. अभी बाकी है’ असं त्या म्हणाल्या.
गेल्या अडीच वर्षांत सत्ताधाऱ्यांनी केलेल्या कामगिरीचा जिल्हयातील जनतेत असलेला मोठा रोष आणि आम्ही केलेली विकास कामे यामुळे जनतेनी आम्हाला पसंती दिली. सत्ता असूनही सत्ताधाऱ्यांचा पराभव झाला असे पंकजा मुंडे म्हणाल्या. ओबीसी आरक्षणाच्या निकालापूर्वी निवडणूका घेणे योग्य नव्हते असेही त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.