शिवसेनेची बाजी : माजी मंत्री शशिकांत शिंदेंना सलग तिस-यांदा पराभवाचा धक्का

मुंबई नगरी टीम

सातारा । राज्यातील नगरपंचायत निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस बाजी मारीत असल्याचे चित्र असतानाच सातारा जिल्ह्यातील कोरेगाव या ऱाष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीचा पराभव केला आहे.विधानसभा निवडणूक आणि त्यांनतर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील पराभवानंतर राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे यांना तिस-यांदा पराभवाचा सामना करावा लागला आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीत धक्कादायक निकाल लागले आहेत.एकूण १७ जागांपैकी १३ जागांवर शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी विजय मिळवला आहे.तर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे यांना केवळ ४ जागा मिळाल्या आहेत.कोरेगावातील निकाल राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या कोरेगाव शहर विकास पॅनलने १३ जागा जिंकल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पॅनलला अवघ्या ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे.सर्वाधिक जागा जिंकत कोरेगाव नगरपंचायतीवर शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांची सत्ता आली आहे.विधानसभा निवडणुकीत कोरेगावमधून माजी मंत्री शशिकांत शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर दोनच महिन्यांपूर्वी झालेल्या सातारा जिल्हा बँक निवडणुकीतही आमदार शशिकांत शिंदे यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यांनतर आता कोरेगाव नगरपंचायतीत झालेल्या पराभवामुळे शशिकांत शिंदे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

Previous articleकर्जतमध्ये भाजपच्या माजी मंत्र्याला आमदार रोहित पवारांनी दाखवले आस्मान
Next articleबीडमध्ये पंकजा मुंडेंचा जलवा ! राष्ट्रवादीला ‘जोर का झटका’