मुंबई नगरी टीम
मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत बोलताना महाराष्ट्र काँग्रेसने देशात कोरोना पसरवल्याचा असा आरोप केला होता.मोदींच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागावी यासाठी भाजपच्या नेत्यांच्या घरासमोर आंदोलन छेडले आहे.या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर धडक देणार होते.मात्र पोलीसांचा मोठा फैजफाट आणि विरोधासाठी भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने काँग्रेसला आपले आंदोलन तात्पुरते मागे घ्यावे लागले असले तरी काँग्रेस सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी गनिमी कावा करत फडणवीस यांचे सरकारी निवासस्थान सागरवर थेट धडक मारली.
महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागावी यासाठी राज्यभर सुरु असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थानी काँग्रेसने धडक मारण्याचा प्रयत्न केला.काँग्रेसच्या आंदोलनाला विरोध करण्यासाठी भाजपाचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरल्याने काँग्रेसने आपले आंदोलन तात्पुरते मागे घेतले. मात्र नरेंद्र मोदी महाराष्ट्राची माफी मागेपर्यंत आंदोलन सुरुच राहिल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी काँग्रेसच्या नेत्यांना फडणवीसांच्या बंगल्यावर येऊन दाखवा असे आव्हान दिले होते.ते स्वीकारून काँग्रेस सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी गनिमी कावा करत फडणवीस यांचे सरकारी निवासस्थान सागरवर थेट धडक मारली.यावेळी मोदींच्या विरोधात घोषणाबाजी करणा-या लोंढेंना पोलिसांनी ताब्यात घेतले.लोंढे यांनी सागर बंगल्यावर थेट धडक मारली व परतही आले पण त्यांना आव्हान देणारे प्रसाद लाड मात्र कुठेही त्यांचा प्रतिकार करायला आले नाहीत किंवा दिसलेही नाहीत असा टोला काँग्रेसच्या नेत्यांनी लगावला.
पंतप्रधान मोदी यांनी संसदेत बोलताना महाराष्ट्राने देशात कोरोना पसरवला असा आरोप करुन शिवरायांच्या महाराष्ट्राचा अपमान केला.मोदींनी महाराष्ट्राचा अपमान केला असून माफी मागावी यासाठी काँग्रेसने राज्यभर आंदोलन सुरु केले असून औरंगाबाद,नागपूर व भिवंडी येथे भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यात आले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थानी आज आंदोलन केले. नाना पटोले यांच्यासह काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांनी या आंदोलनात भाग घेतला.काँग्रेसच्या आंदोलकांना पोलिसांनी अडवल्यानंतर नाना पटोले यांना जेथे अडवले तेथेच त्यांनी आंदोलन केले तर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनाही पोलिसांनी अडवले तेथेच आंदोलन केले. प्रदेश सरचिटणीस अतुल लोंढे यांनी फडणवीसांच्या बांगल्यावर गनिमी काव्याने धडक देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांचा निषेध केला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
यावेळी पटोले म्हणाले की, भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, शिवरायांच्या विचारांचा अपमान केला असून भाजपाने त्यांना पाठिंबा दिला आहे, आम्ही त्याचा निषेध करतो. मोदींनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे त्याबद्दल त्यांनी माफी मागितलीच पाहिजे ही आमची मागणी आहे. यासाठी आम्ही आज मुंबईत आंदोलन केले. काँग्रेस अहिंसावादी आहे, हिंसावादी नाही, आमचे आंदोलन झाले आहे. आम्हालाही गुंडगिरी करता येते पण ही आमची संस्कृती नाही. आम्हाला संदेश द्यायचा होता तो आम्ही दिला. परंतु भाजपाने आपला खरा चेहरा मुंबई आणि महाऱाष्ट्राला दाखवला. मोदींच्या माध्यमातून महाराष्ट्र बर्बाद झाला तरी चालेल पण मोदींचे समर्थन करु अशी भाजपाची वृत्ती आहे. भाजपासाठी नरेंद्र मोदी देशापेक्षा मोठे असतील आणि देवेंद्र फडणवीस त्यांना महाराष्ट्रापेक्षा मोठे वाटत असतील पण आमच्यासाठी देश, महाराष्ट्र व महाराष्ट्राची अस्मिता महत्वाची आहे. भाजपानेच लोकांना रस्त्यावर आणून भाडोत्री लोकं उतरवली, त्यांनीच रस्ता जाम केला, त्यांच्यामुळे मुंबईकरांना आज त्रास सहन करावा लागला. मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून आजचे आंदोलन आम्ही तात्पुरते मागे घेत आहोत पण हे आंदोलन सुरुच ठेवण्याची आमची भूमिका कायम आहे.