फसवणूक कोण करत आहे याचे उत्तर संजय राऊत यांनी द्यावे : सोमय्यांचे आव्हान

मुंबई नगरी टीम

मुंबई । रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावात रश्मी ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांनी अन्वय नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जमीन खरेदीचे पुरावे भाजपाचे नेते माजी खा. डॉ. किरीट सोमय्या यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सादर केले. जमीन खरेदीची ही कागदपत्रे व रश्मी ठाकरे यांनी ग्रामपंचायतीला पाठवलेली पत्रे बघितल्यावर फसवणूक, लबाडी कोण करते आहे याचे उत्तर शिवसेना खा. संजय राऊत यांनी द्यावे , असे आव्हान सोमय्या यांनी दिले.

सोमय्या म्हणाले की, कोर्लई गावात रश्मी ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांनी मे २०१४ मध्ये जमीन खरेदी केली. २३ मे २०१९ रोजी रश्मी ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांनी अन्वय नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जमिनीची कर आकारणी आपल्या नावाने करावी अशी ग्रामपंचायतीला विनंती करणारे पत्र सादर केले. तसेच २ फेब्रुवारी २०२१ रोजी रश्मी ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांनी ग्रामपंचायतीला पत्र पाठवून या जमिनीवर आकारलेला मालमत्ता कर अवास्तव असल्याने तो कमी करावा अशी विनंती केल्याचे पत्रच सोमय्या यांनी पत्रकारांसमोर सादर केले.

२ फेब्रुवारी २०२१ रोजी पाठवलेल्या या पत्रात रश्मी ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांनी या जमिनीवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम नव्हते असा उल्लेख केल्याचेही डॉ. सोमय्या यांनी निदर्शनास आणून दिले.ही कागदपत्रे पाहिल्यावर फसवणूक कोण करते आहे हे स्पष्ट होते आहे,असे डॉ. सोमय्या म्हणाले. आपल्याविषयी असभ्य शब्दांचा वापर करणाऱ्या संजय राऊत यांना या शब्दांचा अर्थ तरी माहीत आहे का,असा सवाल सोमय्या यांनी केला. २०१९ मध्ये रश्मी ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांनी पाठवलेल्या पत्रानुसार अन्वय नाईक यांच्याकडून खरेदी केलेली जमीन रश्मी ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांच्या नावाने करण्यास मंजुरी दिल्याबाबतचे कोर्लई ग्रामपंचायत सभेचे इतिवृत्त सोमय्या यांनी सादर केले.

Previous articleनारायण राणे अडचणीत : दिशा सालियनची बदनामी करणा-यांवर कार्यवाही करण्याची मागणी
Next article७ मार्च नंतर अनेक नेते तुरूंगात जाणार आणि ठाकरे सरकार पडणार: पाटलांचा गौप्यस्फोट