मुंबई नगरी टीम
मुंबई । राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नंतर कालच मनी लॅान्ड्रींग प्रकरणी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर यापुढे कोणते नेते तुरूंगात जाणार याची यादीच भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज जाहीर केली आहे.सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्यांची नावे घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सोमय्या यांनी ईडीच्या रडारावर असलेल्या महाविकास आघाडीच्या १२ नेत्यांची नावे जाहीर केली. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार,परिवहनमंत्री अनिल परब,शिवसेना खासदार संजय राऊत, मंत्री हसन मुश्रीफ,शिवसेना आमदार रवींद्र वायकर,मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे,शिवसेना खासदार भावना गवळी,माजी खासदार आनंदराव अडसूळ,आमदार प्रताप सरनाईक,मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नावाचा उल्लेख सोमय्या यांनी केला.यापैकी कोणत्या नेत्याचा आधी नंबर लावायचा याची चिठ्ठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच काढावी,असे आव्हान सोमय्या यांनी दिले आहे. संजय राऊत यांनी मला आणि मुलाला तुरुंगात टाकले तरी राऊत यांच्यावर कारवाई होणारच असा दावाही सोमय्या यांनी केला.कारवाईसाठी आधी कोणाचा नंबर लावायचा याची चिठ्ठी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच काढावी. पण त्यातून केवळ रश्मी ठाकरे यांनाच सूट देण्यात यावी, असे सोमय्या म्हणाले.अनिल परब यांच्यावर रिसॉर्ट प्रकरणी कारवाईची प्रक्रिया सुरू झाली असून संजय राऊत यांच्या धडपडीवरून आता कुणाचा नंबर लागणार हे लक्षात येते असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला.