शिक्षणमंत्र्याच्या कार्यालयातील कर्मचा-यांमुळे मंत्रालयातील आत्महत्येचा प्रयत्न टळला

मुंबई नगरी टीम

मुंबई । मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला शालेय शिक्षण मंत्री कार्यालयातील कर्मचारी विजय डुबल आणि सागर मिरगळ यांनी प्रसंगावधान दाखवून वाचवले. या दोघांच्या धाडसी कृत्यामुळे एका महिलेचे प्राण वाचले.त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो, असे सांगून शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दोघांचे अभिनंदन केले आहे.

काल दुपारच्या सुमारास रूपा मोरे या महिलेने मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या तिस-या मजल्यावरून खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला.शीव येथील त्यांच्या झोपडपट्टी पुनर्वसन इमारतीतील घराचा ताबा मिळत नसल्याने त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.रूपा मोरे या मंत्रालयाच्या तिस-या मजल्यावर असताना त्यांनी अचानक खाडी उडी मारण्याचा प्रयत्न केला.याच मजल्यावर शालेय शिक्षण मंत्र्यांचे कार्यालय आहे.या कार्यालयातील कर्मचारी विजय डुबल आणि सागर मिरगळ यांना अनपेक्षितपणे घडणारी ही बाब लक्षात आल्याने त्यांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ सदर महिलेस उडी मारण्यापासून प्रवृत्त करत रोखल्याने पुढील अनर्थ टळला. त्यांच्या या प्रसंगावधानाचे मंत्रालयात कौतुक होत आहे.डुबल आणि मिरगळ यांनी वेळीच या महिलेला रोखल्यानंतर पोलिसांनी मोरे यांना तात्काळ अडविले.त्यांनतर त्यांना मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आले.धुळ्याच्या धर्मा पाटील या 84 वर्षीय शेतक-याने २०१८ मध्ये मंत्रालयात विष प्राशन केले होते.त्यांचा नंतर उपचारादरम्यान मत्यू झाला.त्याच वर्षी हर्षल रावते या 45 वर्षीय व्यक्तीने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपविले होते.या घटनांनंतर मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर सुरक्षा जाळी लावण्यात आली आहे.

Previous articleराज्याच्या मुख्य सचिवपदी मनुकुमार श्रीवास्तव; देबाशिष चक्रवर्तींना मुदतवाढ नाही
Next articleमुख्यमंत्र्यांनी नवाब मलिकांचा राजीनामा घेतला नाही तर अधिवेशन चालू देणार नाही !