विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा निर्माण कराव्यात

मुंबई नगरी टीम

मुंबई । बदलत्या काळानुसार विद्यार्थी हित लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा देणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.मंत्री उदय सामंत यांनी मुंबई विद्यापीठातील नवीन ग्रंथालय इमारत,नवीन परीक्षा भवन,आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतीगृह,मुलींचे वसतीगृह या इमारतींच्या कामकाजाबाबत आढावा यावेळी घेतला.

मुंबई विद्यापीठाच्या विविध अडचणीसंदर्भात कलिना कॅम्पसमध्ये आढावा बैठक झाली.मुंबई विद्यापीठ आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले आहे या विद्यापीठाची गुणवत्ता अधिक वाढवून विद्यार्थ्यांना उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी राज्य शासन सहकार्य करेल. मुंबई विद्यापीठ,मुंबई महानगरपालिका,एमएमआरडीए यांनी यासंदर्भात समन्वयाने काम करावे. त्यासाठी तातडीने नोडल ऑफिसर नियुक्त करावे त्यामुळे या कामांना गती येईल असे सामंत यावेळी म्हणाले.मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने गांभीर्याने काम करावे, खूप जुने ग्रंथ येथे उपलब्ध आहेत त्यांचे जतन आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. या इमारतीमध्ये विद्यार्थी अभ्यासासाठी बसतात. येथे काही दुर्घटना होऊ नये याकडे विशेष लक्ष देऊन तातडीने नवीन ग्रंथालयामध्ये ग्रंथसंपदा स्थलांतर करावी, यासाठी आवश्यक त्या परवानग्या तातडीने संबंधितांनी द्याव्यात, असे निर्देशही सामंत यांनी यावेळी दिले.

कंत्राटी कामगारांना नियमाप्रमाणे वेतन वेळेवर दिले पाहिजे. अनेक कामगारांना वेतन नियमानुसार मिळत नसल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त होत आहेत त्यावर विद्यपीठाने तातडीने कार्यवाही करावी आणि कामगारांना वेतन द्यावे, असे निर्देश मंत्री सामंत यांनी दिले.मुंबई विद्यापीठ नवीन ग्रंथालय इमारत, नवीन परीक्षा भवन, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतीगृह, मुलींचे वसतीगृह या इमारतीचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत लवकर उद्घाटन करण्याचा निर्णय ही बैठकीत घेण्यात आला.एमएमआरडीएनी विद्यापीठाचा बृहतआराखडा लवकर सादर करावा. मुंबई विद्यापीठात लवकर जनता दरबारचे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये विद्यार्थी, शिक्षक शिक्षेकतर कर्मचारी, विविध प्राध्यापक संघटना यांच्या तक्रारी, पेंशन विषय, प्रलंबित मेडिकल बिल, अनुकंपा भरती याबाबत निर्णय घेण्यात येईल. या जनता दरबारमध्ये सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी सामंत यांनी केले. मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकारकडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पोस्ट कार्डस पाठविण्यात येत आहेत या मोहिमेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही सामंत यांनी यावेळी केले.

राष्ट्रीय विधी विद्यापीठांना १५० कोटींचा निधी मंजूर

राज्य शासनाने मुंबई, औरंगाबाद व नागपूर येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ २०१४ च्या अधिनियमान्वये स्थापन केले असून त्यासाठी शासनाने मागील दोन वर्षात १५० कोटी निधी मंजूर केला आहे. नागपूर येथे वरणगाव परिसरात ६० एकर जागा नागपूर येथील विद्यापीठासाठी दिली आहे. याठिकाणी शैक्षणिक संकुल बांधून पूर्ण झाले आहे. या विद्यापीठांच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.शासकीय विधी महाविद्यालय मुंबई, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ नागपूर यांच्या विविध उपक्रमांचा आढावा आणि शासकीय विधी महाविद्यालय मुंबईच्या आझादी ७५ अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमात भारतीय संविधानाच्या विविध तरतुदींवर आधारित माहिती पुस्तिकेचे प्रकाशन समारंभ झाला.यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शुकरे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ नागपूरचे कुलगुरू विजेंदरकुमार, शासकीय विधी महाविद्यालय मुंबईच्या प्राचार्य अस्मिता वैद्य, बार कॉन्सिलचे सदस्य, प्राध्यापक,विद्यार्थी उपस्थित होते.

सर ज जी कला महाविद्यालयाचा नियोजनबद्ध विकास करावा
राज्य शासनाने सर ज जी कला महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी आत्तापर्यंत ३० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. कला महाविद्यालयाने नियोजनबद्ध विकास आराखडा तयार करून सर ज जी महाविद्यालयाचा विकास करावा, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केल्या.कला संचालनालय तर्फे आयोजित ६१ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन समारोपप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सामंत बोलत होते. यावेळी कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा, वसंत सोनवणी, मनीषा सुर्वे, गणेश तरतरे आदी उपस्थित होते.सामंत म्हणाले, कला महाविद्यालयाची कीर्ती जगभर पसरली आहे. येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाच्या सुविधा दिल्या पाहिजेत. त्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल. कला महाविद्यालयाच्या अडचणी लक्षात घेऊन नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात यावा असा सूचनाही सामंत यांनी यावेळी दिल्या.

Previous articleराज्यातील १४ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल;नाट्यगृहे,मॉल,उपहारगृहे १०० टक्के क्षमतेने सुरू
Next articleसत्ताधारी आमदारांची जोरदार घोषणाबाजी;राज्यपालांनी आटोपले दोन मिनिटांत भाषण