मुंबई नगरी टीम
मुंबई । अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधानभवनाच्या पाय-यावर सरकार विरोधात घोषणाबाजी केली तर मध्यवर्ती सभागृहात झालेल्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अभिभाषणावेळी सत्ताधारी आमदारांची केलेल्या जोरदार घोषणाबाजीमुळे राज्यपालांना आपले अभिभाषण केवळ दोन मिनिटांत उरकावे लागले.विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाने आक्रमक होवून पहिला दिवस गाजवल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आज सुरूवात झाली.अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पाय-यावर राष्ट्रवादीचे नेते आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या अटकेत असलेले नवाब मलिक आणि महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद राज्यपालांच्या अभिभाषणावेळी उमटले.प्रथेप्रमाणे विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात अभिभाषणासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे आगमन होताच सत्ताधारी आमदारांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.या गदारोळात राज्यपालांनी मराठीमध्ये भाषणास सुरूवात केली मात्र सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी तुफान घोषणाबाजी केल्याने राज्यपालांना आपले अभिभाषण अवघ्या दोन मिनिटांमध्ये आटोपते घ्यावे लागले.सत्ताधारी आमदारांनी केलेल्या घोषणाबाजीचा विरोधकांनी निषेध करत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या एका विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.राज्यपालांच्या या विधाना विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर आंदोलन केले होते.राज्यात सरकार आणि भाजपामध्ये आरोपांच्या फैरी झडत असतानाच आज झालेल्या प्रकारामुळे सरकार विरूद्ध राज्यपाल असा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.दुसरीकडे महाविकास आघाडीने राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी विधानभवन परिसरात आंदोलन केले.पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजय वडेटटीवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने राज्यपाल हटाव मोहीम उघडत, शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या राज्यपालांचा धिक्कार असो,अशी घोषणाबाजी केली.
राज्यपालाकडून राष्ट्रगीताचा अवमान…जयंत पाटील
भाजप आमदारांच्या बेशिस्तपणामुळे राज्यपाल यांना सभागृह सोडावे लागले असा आरोप करीत, महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही न घडलेली दुर्दैवी घटना आज घडलेली आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आम्हीही विरोधी पक्षात होतो पण आम्ही कधीच सभागृहाचा अपमान केला नाही असेही पाटील म्हणाले.राज्यपाल सभागृहात आले तेव्हा महाविकास आघाडीच्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करत त्यांचे स्वागत केले.मात्र भाजपच्या लोकांनी गोंधळ घातला.फलक झळकवली त्यामुळे राज्यपाल राष्ट्रगीत पूर्ण होण्याआधीच निघून गेले.हा राष्ट्रगीताचाही अपमान आहे असेही पाटील यांनी सांगितले.