मुंबई नगरी टीम
मुंबई । ‘ओबीसी आरक्षण वाचवा’,अशी टोपी जरी तुम्ही घातली.तरी ठाकरे सरकार तुम्हाला टोपी लावत आहे.त्याची फसवी टोपी घालू नका,असा चिमटा अन्न व नागरी पुरवठामंत्री भुजबळांना काढत राज्य सरकारची ओबीसी आरक्षण विषयी स्पष्ट भूमिका नाही.सर्वोच्च न्यायालयात ठाकरे सरकारचे मोठे हासे झाले असून,सरकारच्या वकिलांना साधी उत्तरेही देता आली नाहीत.राज्यातील ओबीसींना राजकीय आरक्षणापासून वंचित ठेवले जात आहे,असा आरोप करीत यापुढे आरक्षणाशिवाय एकही निवडणूक होऊ देणार नाही,असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिला. त्यावेळी विरोधी पक्षाच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी आणि फलक झळकवत सभागृहात गोंधळ घातला.
आज विधानसभेच्या कामकाज सुरु होताच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करीत ओबीसीच्या आरक्षणावर महाविकास आघाडी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.सभागृहाचे सर्व कामकाज बाजूला ठेवून ओबीसी राजकीय आरक्षणावर चर्चा करा,अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.तुमच्या उत्तराने आम्ही समाधानी नाही. २०१० निकाल आला. २०१९ पासून काही झालेले नाही.बोलायला तुम्ही खूप हुशार आहात.बोलता बोलता तुम्ही आम्हाला टोमणे मारले.तेव्हा आता काहीही नाही.चर्चा नको,निर्णय झाला पाहिजे अशा शब्दात त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकही काम झालेले नाही.राज्य सरकारचा इंपिरिकल अहवाल म्हणजे थट्टा आहे.या अहवालावर साधी तारीख आणि सह्या नव्हत्या.डेटा कुठून गोळा केला असे न्यायालयाने विचारले असता सरकारी वकिलाकडे उत्तर नव्हते असे सांगून, तुमच्यावर कोणाचा दबाब आहे ? तुम्ही कोणाच्या दबावाखाली तुम्ही काम करता ? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांना विचारला.मध्यप्रदेश सरकार प्रमाणे राज्य सरकारने कायद्यात बदल करावा त्याला आम्ही पाठिंबा देऊ,अशी भूमिका फडणवीस यांनी यावेळी मांडली.
“ओबीसी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे” ओबीसींचा घात करणा-या सरकारचा निषेध असो,राज्य सरकार हाय हाय,कोण म्हणतो देणार नाही,घेतल्या शिवाय राहणार नाही,ओबीसींच्या मागण्या मान्य करा,नाहीतर खूर्चा खाली करा.आघाडी सरकार काय म्हणते,ओबीसी आरक्षण नाय म्हणते,गली गली मे शोर है,ठाकरे सरकार चोर है! बघता काय सामील व्हा” या घोषणांनी विरोधकांनी सभागृह दणाणून सोडले.विरोधकांच्या या गोंधळात विधानसभेचे कामकाज सुरुवातीला २० मिनिटांसाठी नंतर पुन्हा १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.अखेर विरोधकांच्या गोंधळात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी प्रश्नोत्तरे,एस.टी. महामंडळाचा अहवाल,राज्यपालाच्या अभिभाषणवरील चर्चा आणि इतर कामकाज उरकून घेत विधानसभेचे कामकाज दिवसासाठी तहकूब केले.