मुंबई नगरी टीम
मुंबई । बीडमधील जिल्हाधिकारी कार्यालयात काही दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबार प्रकरणाचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले.बीडमधील कायदा व सुवस्थेच्या तक्रारींची वरिष्ठ पोलिस अधिका-यामार्फत चौकशी करण्यात येवून हा अहवाल पंधरा दिवसात सादर करण्यात येईल असे सांगतानाच,तोपर्यंत बीडच्या पोलिस अधिक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येईल अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत आज केली.
बीडमधील जिल्हाधिकारी कार्यालयात काही दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबार प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. बीडमध्ये धाब्यांवर खुलेआम दारु विक्री होत असल्याचे भाजपच्या सदस्या नमिता मुंदडा यांनी सांगितले.बीडमधील एका रसवंतीगृहात आपण उसाचा रस पिण्यासाठी गेलो होतो तेव्हा समोरच्या ढाब्यात दारु विक्री करणा-या लोकांनी आपल्यासोबत सेल्फी काढण्याचा आग्रह करीत आपल्या मोटारीला घेराव घातला.या प्रकरणी पोलिसांनी तक्रारही घेतली नाही असेही त्यांनी सांगून, बीडमधील पोलिस अधिक्षकांना निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली.यावेळी नाना पटोले यांनी राज्यातील वाळू माफियांचा प्रश्न उपस्थित करून वाळू माफियाराज थांबवण्याची मागणी त्यांनी केली.राज्यात वाळू माफियांची समस्या गंभीर होत चालली आहे.त्यामुळे वाळू माफियांच्या विरोधात कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या जातील असेही गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगून,नमिता मुंदडा यांच्या तक्रारीवर कारवाई न करणा-या पोलिस निरिक्षकाला निलंबित करण्याची घोषणा त्यांनी केली.बीडमधील कायदा व सुवस्थेच्या तक्रारींची वरिष्ठ पोलिस अधिका-यामार्फत चौकशी करून पंधरा अहवाल सादर करण्यात येईल. तोपर्यंत बीडच्या पोलिस अधिक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येईल अशी माहिती गृहमंत्री पाटील यांनी दिली.