मुंबई नगरी टीम
मुंबई । काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार १० मार्चला पडणार असे भाकीत केले होते.आज देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले.यात चार राज्यात भाजपला मोठे यश मिळाले असले तरी पाटील यांनी राज्यातील ठाकरे सरकार पडणार असल्याचे भाकीत फोल ठरल्याचे निष्पन्न झाले असले तरी,मी दिलेल्या तारखांना बॉम्ब पडला,१० तारखेला चार राज्ये जिंकली आता पाहू,११ तारखेला काय होतं असं सांगत त्यांनी आज नवा मुहूर्त सांगितला आहे.
पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर म्हणजे १० मार्चनंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल,असे भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वर्तविले होते.१० मार्चनंतर महाविकासआघाडी सरकारला सत्ता सोडावी लागेल असा दावाही त्यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.सत्ताधारी महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उफाळले आहेत.सरकारमधील मंत्री एकापाठोपाठ तुरुंगात जात आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल १० मार्च रोजी लागल्यानंतर अशी स्थिती निर्माण होईल की,महाविकास आघाडीला सत्तेवरून जावे लागेल,असे पाटील म्हणाले होते. आज पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला.त्यानंतर भाजप प्रदेश कार्यालयात मोठा जल्लोष करण्यात आला.पाच राज्यांचा निकाल आज जाहीर झाला मात्र राज्यातील ठाकरे सरकार कोसळले नाही.त्यामुळे चंद्रकांतदादांचा दावा फोल ठरल्याची चर्चा आहे.आता चंद्रकांतदादांनी आता नवे भाकीत वर्तवले आहे. विधान केले होते. मी दिलेल्या तारखांना बॉम्ब पडला,१० तारखेला चार राज्य जिंकली आता पाहू, ११ तारखेला काय होते असे म्हणत पाटील यांनी सांगत आता राज्यातील ठाकरे सरकार पडण्याचा नवा मुहूर्त सांगितला आहे.
गोवा विधानसभा निवडणुकीतील यशाबद्दल भाजपाचे गोवा निवडणूक प्रभारी आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाटील यांनी विशेष अभिनंदन केले.निवडणूक प्रभारी म्हणून फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला बिहार विधानसभा निवडणुकीत यश मिळाले.त्यानंतर आता गोव्याची विधानसभा निवडणूक भाजपाने फडणवीस यांच्या नेतृत्वात जिंकली असल्याचे पाटील म्हणाले.प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून विकास कार्य केले. त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने सामान्य लोकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण केले. कोरोनाच्या संकटात मोदी सरकारने देशातील जनतेची सेवा केली. याच पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाच्या राज्य सरकारने गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या राज्यातही सामान्य माणसासाठी काम केले. त्यामुळे भाजपाच्या यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते.गोवा विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या यशासाठी पक्षाचे गोव्याचे प्रभारी आणि राष्ट्रीय सरचिटणीस मा. सी. टी. रवी यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीतील यशानंतर महाराष्ट्रात भाजपाचे उद्दीष्ट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये विजय मिळविण्याचे आहे. भाजपा मुंबई महानगर पालिकेवर आपला भगवा झेंडा फडकवेल.