शिंदे सरकार केव्हा कोसळणार ? जयंतराव पाटलांनी सांगितला थेट मुहूर्त

मुंबई नगरी टीम

औरंगाबाद। भाजपच्या गणिताची योग्य जुळवाजुळव जमली की राज्यातील शिंदे सरकार कोसळेल,असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.ज्यावेळी सरकार कोसळेल तेव्हा आपण किती मोठी चूक केली आहे हे एकनाथ शिंदे यांना कळेल असे सांगून सरकार टिकणार नाही म्हणून अधिकारी सुद्धा यांचे ऐकत नसल्याचा टोला पाटील लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी मराठवाडा विभागाच्या दौ-यावर असून त्यांनी अहमदनगर व औरंगाबाद येथे शहर व ग्रामीण संघटनेचा आढावा घेतला.यावेळी पाटील यांनी राज्यातील शिंदे सरकारवर हल्लाबोल केला.यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली.राज्यातील शिंदे सरकार केव्हाही कोसळेल असा दावा करतानाच या सरकारची प्रशासनावरची पकड मजबूत नसल्याचे त्यांनी सांगितले.मुख्यमंत्री शिंदे हे केवळ आपल्या गटातील आमदारांच्या ४० मतदार संघापुरत्या घोषणा करीत आहेत.त्यामुळे उरलेल्या मतदारसंघाचे काय ? असा सवाल पाटील यांनी केला.मुख्यमंत्री केवळ घोषणा करीत आहेत.मात्र त्यांचे शासन निर्णय किंवा आदेश काढले नाहीत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केवळ लिहिलेले भाषण वाचतात,अशी टीकाही पाटील यांनी केली आहे.

या भागातील आढावा घेताना त्यांनी कार्यकर्त्यांकडून पक्ष वाढीसंदर्भात त्यांच्या संकल्पना जाणून घेतल्या.मागील काळात आपल्या या जिल्ह्यांनी मोठ्या प्रमाणावर शरद पवार यांना ताकद दिली होती याची आठवणही पाटील यांनी करून दिली.आपल्याला आपला पक्ष वाढवायचा असेल तर पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने तळागाळात सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे. शहरातील वॉर्डा – वॉर्डात बुथ लावुन नोंदणी अभियान राबविले पाहिजे असे आवाहनही पाटील यांनी केले. अहमदनगर जिल्ह्याने नेहमीच राष्ट्रवादी विचारांना साथ दिली आहे. नगर जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आपल्याला हा बालेकिल्ला अबाधित ठेवायचा असेल तर सामान्यातील सामान्य घटकाला पक्षात समाविष्ट करून घेतले पाहिजे.अहमदनगर जिल्ह्यातून आपल्या पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून येतील याबाबत पाटील यांनी विश्वास व्यक्त केला.
जनमताचा कौल सध्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकार पाडलं गेलं ते लोकांना पटलेले नाही. शिंदे गटाने केलेली गद्दारी ही लोकांना रुचलेली नाही. हे सरकार आल्यापासून महाराष्ट्राच्या अधोगतीचे निर्णय घेतले जात आहेत असा आरोपही जयंत पाटील यांनी केला. नुकताच सेमी कंडक्टरचा प्रोजेक्ट महाराष्ट्राच्या हातातून हिसकावून घेतला गेला. फॉक्सकॉन’चा प्रोजेक्ट जर महाराष्ट्रात आला असता तर इतर कंपन्यांनीही प्रोत्साहित होऊन त्यांचे प्रोजेक्ट आपल्या राज्यात आणण्यासाठी इच्छा व्यक्त केली असती. परंतु मुख्यमंत्री हे दिल्लीश्वरांच्या इच्छेपुढे नमले असा टोलाही पाटील यांनी लगावला.

Previous articleपन्नास खोके मजेत बोके, महाराष्ट्राला धोके… शिंदे -फडणवीस तुपाशी, महाराष्ट्र उपाशी !
Next articleफडणवीसांच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंची ‘डरकाळी’ नागपुरात भाजपाशी दोन हात करणार