कृषी,आरोग्य,मनुष्यबळ विकास,दळणवळण आणि उद्योगाला चालना देणारा ‘पंचसूत्री’ अर्थसंकल्प

मुंबई नगरी टीम

मुंबई । कृषी,आरोग्य,मनुष्यबळ विकास,दळणवळण आणि उद्योग या पंचसूत्रीत राज्याच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही देत राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सन-२०२२-२३ या वर्षाचा व महाविकास आघाडी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर केला.तर राज्यमंत्री व शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत अर्थसंकल्प मांडला.हा अर्थसंकल्प मांडताना २४ हजार ३५३ कोटी महसुली तूट राहील असा अंदाज वर्तविला आहे.२०२२-२३ या वर्षात ४ लाख ३ हजार ४२७ कोटी रूपये जमा प्रस्तावित असून,तर महसुली खर्च ४ लाख २७ हजार ७८० कोटी खर्च अपेक्षित आहे,असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

सन २०२२-२३च्या अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा ४ लाख ३ हजार ४२७ कोटी रुपये व महसूली खर्च ४ लाख २७ हजार ७८० कोटी रुपये अंदाजित आहे.अर्थव्यवस्थेची गती मंदावली आहे याचा उल्लेख करतानाच,राज्य शासन विकासासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करील अशी ग्वाही अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली.पंचसुत्रीतील कृषी संदर्भात अर्थमंत्री म्हणाले,शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ६ मार्च २०२० रोजी पन्नास हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती.ती वचनपूर्ती यावर्षी होईल. याचा २० लाख शेतकऱ्यांना लाभ होणार असून,त्यासाठी १०हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
आरोग्य सेवा हे दुसरे सूत्र मांडताना यासाठी आरोग्य संस्थांच्या श्रेणी वर्धन बांधकामासाठी ७ हजार ५००कोटी रुपये किंमतीचा जो प्रकल्प जाहीर केला होता.त्यासाठी हुडकोकडून कर्ज घेऊन २०२२-२३ मध्ये या प्रकल्पाला २ हजार कोटी तर १५ व्या वित्त आयोग शिफारशीनुसार १ हजार ३३१ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. नियमित अर्थसंकल्पीय निधी व्यतिरीक्त आरोग्य सेवांवर येत्या ३ वर्षांत सुमारे ११ हजार कोटी रुपये निधी खर्च करण्याचे नियोजन असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगून, मनुष्यबळ विकास या पंचसूत्रीतील तिस-या सुत्राची अंमलबजावणी करताना,एकही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये याची काळजी घेण्याची ग्वाही त्यांनी दिली.आदिवासी विकास,सामाजिक न्याय,इतर मागास बहुजन कल्याण, अल्पसंख्याक विकास,कौशल्य विकास,शालेय शिक्षण,उच्च व तंत्रशिक्षण तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या सर्व योजना लाभार्थिंच्या आधार क्रमांकाशी १ जून २०२२ पूर्वी जोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सन-२०२२-२३ या वर्षासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला सर्व साधारण योजनेसाठी २ हजार ८७६ कोटी, अनुसुचित जाती घटक कार्यक्रमाकरिता १२ हजार २३० कोटी असा एकूण १५ हजार कोटी रुपये प्रस्तावित आहे.विकास पंचसूत्रीतील चौथे सूत्र रस्ते विकास यामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-२ अंतर्गत सुमारे ७ हजार ५०० कोटी रुपये किंमतीच्या १०हजार कि.मी.लांबीच्या रस्त्यांना मंजूरी दिली असून येत्या दोन वर्षांत ही कामे पूर्ण होतील असेही पवार यांनी सांगतिले. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नागपूर ते भंडारा-गोंदिया आणि नागपूर ते गडचिरोली असा विस्तारित करण्यात येईल. सन-२०२२-२३ वर्षांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ते विकासासाठी १५ हजार ६७३ कोटी रुपये व इमारत बांधकाम करिता १ हजार ८८कोटी नियंत्रण प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्योग या पाचव्या सूत्राकडे सभागृहाचे लक्ष वेधताना अर्थमंत्री पवार म्हणाले,राज्य आता वैद्यकीय ऑक्सिजन बाबतीत स्वयंपूर्ण झाले आहे.मॅग्नेटिक महाराष्ट्र २ अंतर्गत नामांकित उद्योगांशी ९८ गुंतवणूक करार झाले आहेत.त्यातून १ लाख ८९ हजार कोटी रुपये गुंतवणूक अपेक्षित आहे.तर ३ लाख तीस हजार नवे रोजगार निर्माण होतील.राज्यात इलेक्ट्रिक वाहन नोंदणी १५७ टक्के वाढली असे सांगून ते म्हणाले,२०२५ पर्यंत १०टक्के इतका इलेक्ट्रिक वाहन नोंदणीत हिस्सा वाढविणे हे उद्दिष्ट आहे.मुंबई पारेषण प्रणाली क्षमतेतवाढ करण्याची आवश्यकता असून, त्यामुळे ११ हजार ५३० कोटी रुपये खर्च करून चारशे कि.वॅट क्षमतेची चार उपकेंद्रे आणि १ हजार मेगावॅट क्षमतेचा अति उच्चदाब वाहिन्यांचा पारेषण प्रकल्प राबविण्यात येईल.अर्थमंत्री पवार म्हणाले, या विकास पंचसूत्री कार्यक्रमासाठी या अर्थसंकल्पात १५ हजार २१५ कोटींची तरतूद प्रस्तावित आहे.अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विधान भवन वार्ताहर कक्षात पत्रकार परिषदेत अर्थमंत्री पवार यांनी केंद्र सरकारकडून अद्याप २६ हजार ५०० कोटी रुपये इतकी जीएसटीची थकबाकी येणे असल्याचे सांगितले.

अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये
कृषी व संलग्न
विकासाची पंचसूत्री-कृषी,आरोग्य,मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या क्षेत्रांसाठी १ लाख १५ हजार २१५ कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित. येत्या तीन वर्षांत ४ लाख कोटी रूपये उपलब्ध करुन देणार. कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी २३ हजार ८८ कोटी तरतुद.आरोग्य क्षेत्रासाठी ५ हजार २४४ कोटी रुपये तरतुद.मानव व मनुष्यबळ विकासासाठी ४६ हजार ६६७ कोटी तरतुद.पायाभूत सुविधा व वाहतूकीसाठी २८ हजार ६०५ कोटी तरतुद.उद्योग व उर्जा विभागासाठी १० हजार ११ कोटीची तरतुद.
नियमित कर्जफेड करणारे शेतकरी २० लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपये अनुदान देणार.यासाठी १० हजार कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे.
भूविकास बँकेच्या ३४ हजार ७८८ कर्जदार शेतकऱ्यांची ९६४ कोटी १५ लाख रूपयांची कर्जमाफी, बँकेच्या कर्मचाऱ्यांची २७५ कोटी ४० लाख रूपये एवढी देणी अदा करणार.
सोयाबीन व कापूस पिकांसाठी विशेष कृती योजनेसाठी ३ वर्षात १ हजार कोटी रुपये निधी देण्यात येणार
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेततळ्याचा समावेश करून अनुदानाच्या रकमेत ५० टक्के वाढ करुन ते ७५ हजार रूपये वाढ .
बाजार समित्यांनी पायाभूत सुविधांसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजाची १०० टक्के परतफेड करण्यासाठी सहाय
किमान आधारभूत किंमतीनुसार शेतमाल खरेदी कर‍िता ६ हजार ९५२ कोटी रूपयांची तरतूद
कृषी निर्यात धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य
२० हजार ७६१ प्राथमिक कृषि पतपुरवठा सहकारी संस्थांचे संगणकीकरण करण्याकरीता ९५० कोटी रूपयांची गुंतवणूक
मागील दोन वर्षात २८ सिंचन प्रकल्पात पाणीसाठा करण्यात आला असून येत्या दोन वर्षात १०४ प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन
गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी सन २०२२-२३ मधे ८५३ कोटी ४५ लाख रुपये निधी
मृद व जलसंधारणाची दोन वर्षात ४ हजार ८८५ कामे पूर्ण करण्याचे नियोजन, ४ हजार ७७४ कोटी रुपये खर्च प्रस्ताव‍ित
२०२२-२३ मधे ६० हजार कृषिपंपांना वीज जोडणीचे उद्दीष्ट.
रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजनेमधे केळी, ड्रॅगन फ्रुट, एव्हॅकॅडो, द्राक्षे आदी फळ पिके तसेच अन्य महत्त्वाच्या मसाला पिकांचा नव्याने समावेश
देशी गायी, म्हशींची उत्पादकता वाढवण्यासाठी विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी प्रत्येकी एक, अशा एकूण तीन मोबाईल प्रयोगशाळा
सार्वजनिक आरोग्य
नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, अहमदनगर आणि सातारा येथे प्रत्येकी ५० खाटांची प्रथम दर्जाची ट्रॉमा केअर युनिट उभारणार.
२०० खाटांच्या सर्व रुग्णालयांमध्ये येत्या तीन वर्षात लिथोट्रिप्सी उपचार पद्धती सुरु करणार.
मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आधुनिक “फेको” उपचार पद्धती सुरु करणार
५० खाटांच्या रुग्णालयांना यांत्रिक धुलाई संयंत्रे व ३० खाटांवरील रुग्णालयांना स्वच्छता यंत्रे देणार.
मोबाईल कर्करोग निदान वाहनांची सुविधा देणार
हिंगोली,यवतमाळ, बुलढाणा, सांगली , सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर ,रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी १०० खाटांची स्त्री रुग्णालये स्थापन करणार
जालना येथे ३६५ खाटांचे नवीन प्रादेशिक मनोरूग्णालय स्थापन करण्याकरीता ६० कोटी रुपये उपलब्ध करणार
मुंबई येथे सेंट जॉर्ज पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था, नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठात वैद्यकीय पदव्युत्तर संस्था, नागपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था येथे पदव्युत्तर संस्था स्थापन करण्यात येणार.
अन्न सुरक्षा कार्यप्रणालीचे बळकटीकरणासाठी 2 वर्षात १०० कोटी उपलब्ध करणार
पुणे शहराजवळ अत्याधुनिक “इंद्रायणी मेडिसीटी” उभारण्यात येणार.
रोजगारक्षम मनुष्यबळ निर्माणासाठी ५०० कोटी रुपये खर्चून “ इनोव्हेशन हब ” स्थापन करण्यात येणार.
स्टार्ट अप फंडासाठी १०० कोटी
मनुष्यबळ विकास
१ लाख २० हजार अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना ई शक्ती योजनेतून मोबाईल सेवा देणार
बालसंगोपनाच्या निधीत ११२५ रुपयांवरुन १५०० रूपयांपर्यंत अनुदानात वाढ
प्रत्येक जिल्हयाच्या ठिकाणी अमृत महोत्सवी महिला व बाल भवन उभारणार.
नागरी भागातील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्रे सुरु करणार.
शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिंनीसाठी मोफत सॅनिटरी नॅपकीन डिस्पेन्‍सींग मशिन
दळणवळण
मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-२ अंतर्गत १०,०० कि.मी. लांबीच्या रस्त्याकरीता ७५०० कोटी रूपये तरतुद.
६५५० कि.मी. लांबीच्या पंतप्रधान ग्रामसडक योजना टप्पा-३ चा प्रारंभ.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचा नागपूर ते भंडारा-गोंदिया,नागपूर ते गडचिरोली असा विस्तार करणार.
१६०३९ कोटी रुपयांच्या नाशिक-पुणे मध्यम अतिजलद रेल्वे प्रकल्पाकरीता भूसंपादन सुरु.
मुंबईतील मेट्रो मार्गिका क्रमांक ३, कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मार्ग‍िकेचा विस्तार कफ परेडपासून नेव्हीनगरपर्यंत.
पुण्यातील स्वारगेट ते कात्रज व पिंपरी ते निगडी, वनाझ ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, स्वारगेट ते हडपसर, हडपसर ते खराडी, खडकवासला ते स्वारगेट मेट्रो प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरु.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ३००० नवीन बसगाड्या व १०३ बसस्थानकांच्या आधुनिकीकरण यासाठी भांडवली अर्थसहाय्य.
शिर्डी ,रत्नागिरी , अमरावती व कोल्हापूर विमानतळाची कामे गडचिरोलीला नवीन विमानतळ
उद्योग
मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत ९८ गुंतवणूक करारातून १८९००० हजार कोटी रूपये गुंतवणूक आणि रोजगाराच्या ३ लाख ३० हजार नवीन संधी
ई-वाहन धोरणांतर्गत सन २०२५ पर्यंत वाहन नोंदणीत इलेक्ट्रीक वाहनांचा हिस्सा १० टक्के व मोठ्या शहरांच्या सार्वजनिक वाहतुकीतील हिस्सा २५ टक्के करण्याचे उद्द‍ीष्ट. ५ हजार चार्जिंग सुविधा उभारणार.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत ३० हजार अधिक स्वयंरोजगार प्रकल्पातून सुमारे १ लाख रोजगार संधी
कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी १०० टक्के व्याज परताव्याची पंड‍िता रमाबाई स्मृती शताब्दी महिला उद्योजक ही नवीन योजना.
मौजे कौडगाव व मौजे शिंदाळा (जि.लातूर), मौजे साक्री (जि.धुळे), वाशीम, मौजे कचराळा (जि.चंद्रपूर) आणि यवतमाळ येथे एकूण ५७७ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प, राज्यात २५०० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा पार्क.
मुंबईत पारेषण प्रणालीच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी ११५३० कोटी रुपयाचे ५ प्रकल्प.
“भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय व संग्रहालय” स्थापित करण्यासाठी १०० कोटी रूपये निधी राखीव.
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमीत्त वढु बुद्रुक व तुळापूर, ता.हवेली जि.पुणे या परिसरात स्मारकासाठी २५० कोटी रुपये निधी उपलब्ध करणार.
छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार योजना” सुरु करणार.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापुरूषांशी संबंधित गावांतील १० शाळांकरिता १० कोटी रुपये निधी
मुंबई, पुणे व नागपूर येथे स्वातंत्र्यलढ्याशी निगडीत स्थळांचा “हेरिटेज वॉक”
रायगड किल्ला व परिसर विकासाकरीता १०० कोटी, राजगड, तोरणा, शिवनेरी, सुधागड, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग या सहा किल्ल्यांसाठी १४ कोटी, मुंबईतील शिवडी व सेंट जॉर्ज किल्ल्यांच्या जतन व संवर्धन आराखड्यांसाठी ७ कोटी प्रस्तावित.
छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आणि त्यांच्या गनिमी कावा युद्ध पद्धतीला जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यासाठी युनेस्कोकडे सविस्तर प्रस्ताव दाखल करण्याकरीता नियतव्यय प्रस्तावित.
“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” या उपक्रमांतर्गत ५०० कोटीची तरतूद,स्वातंत्र्य सैनिकांना निवासी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी मासिक उत्पन्नाची १० हजार रुपयांची मर्यादा ३० हजार रुपये
औरंगाबाद येथील अमृतमहोत्सवी वंदे मातरम् सभागृहांकरीता ४३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
अष्टविनायक विकास आराखड्याकरीता ५० कोटी रुपये
पंढरपूर देवस्थान मंदिर विकासासाठी ७३ कोटी ८० लाख रूपये रकमेचा आराखडा
मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष कार्यक्रमासाठी ७५ कोटी रुपये.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले,राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक उभारणार, महाराणी सईबाई स्मृतीस्थान विकास आणि श्री संत जगनाडे महाराज स्मारकांसाठी निधी उपलब्ध करुन देणार.
पंतप्रधान आवास योजना ग्रामीण भागातील ५ लाख घरकुल बांधकामाकरीता ६००० कोटी रूपये उपलब्ध करुन देणार.
मुंबईबाहेरील झोपडपट्टयांमधील सुधारणा मुलभूत कामे करण्यासाठी १०० कोटी रूपये उपलब्ध करुन देणार.
कोयना,जायकवाडी व गोसीखुर्द येथे जल पर्यटन प्रकल्प प्रस्तावित
जव्हार जि.पालघर, फर्दापूर जि.औरंगाबाद, अजिंठा,वेरूळ,महाबळेश्वर व लोणावळा येथे पर्यटन विकासाकरीता सुव‍िधा निर्माण करण्यासाठी अनुदान.
पुरातत्व स्मारकांच्या जतन, संवर्धन आणि दुरुस्तीसाठी जिल्हानिहाय “महावारसा सोसायटीची स्थापना.
बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात “आफ्रिकन सफारी” सुरु करणार.
पुणे वन विभागात बिबट्या सफारी सुरु करणार.
बार्टी,सारथी,महाज्योती या संस्थाना विविध विकास योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येकी 250 कोटी रूपये
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधीत्व निश्चित करण्यासाठी नवीन समर्पित मागासवर्गीय आयोगाची स्थापना
मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची भागभांडवल मर्यादा ५०० कोटी रुपयांवरुन वाढवून ७०० कोटी रुपये

Previous articleअर्थसंकल्प : किल्ले रायगड व परिसर विकासाकरीता १०० कोटी
Next articleपंचसूत्रीच्या यशस्वी अंमलबजावणीतून एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची उद्दिष्टपूर्ती