मुंबई नगरी टीम
मुंबई । महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांची मुदत येत्या ४ जुलै २०२२ रोजी संपत असून,पुढील तीन महिन्यात जे सदस्य निवृत्त होत आहेत.त्यामध्ये केंद्रीयमंत्री पियुष गोयल,राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांच्यासह महाविकास आघाडीचे शिल्पकार शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचाही समावेश असून, राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात असल्याने त्यांना राज्यसभेवर जाण्याची चौथ्यांदा संधी मिळण्याची शक्यता आहे.
विधानपरिषदेतील १० आमदारांची मुदत ७ जुलै तर ठाणे स्थानिक प्राधिकरण संस्थामधून विधानपरिषदेवर गेलेले शिवसेनेचे आमदार रविंद्र फाटक यांची मुदत येत्या ८ जून रोजी संपत आहे.तर दुसरीकडे महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांची मुदत येत्या ४ जुलै रोजी संपत आहे.केंद्रीयमंत्री पियुष गोयल ( भाजप) विकास महात्मे ( भाजप), विनय सहस्त्रबुद्धे ( भाजप) तर माजी केंद्रीयमंत्री पी.चिदंबरम ( काँग्रेस ) प्रफुल पटेल ( राष्ट्रवादी काँग्रेस ) आणि संजय राऊत ( शिवसेना) या महाराष्ट्रातील राज्यसभा सदस्यांची मुदत येत्या ४ जुलै रोजी संपत आहे.राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या रिक्त होणा-या जागांसाठी एकत्रित निवडणूक घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणण्यात महत्वपूर्ण कामगिरी बजावणारे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे शिवसेनेकडून तीव वेळा राज्यसभेवर गेले आहे.मविआ सरकार आणण्यात त्यांनी बजावलेली भूमिका आणि शिवसेनेचा विस्तार करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राऊत यांना राज्यसभेसाठी चौथ्यांदा संधी देण्याची शक्यता आहे.