मुंबई नगरी टीम
मुंबई । विधानपरिषदेचा कार्यकाळ संपत आल्याने पवारसाहेबांवर टिका करुन देवेंद्र फडणवीस यांना खूश करण्यासाठी सदाभाऊ खोत अशी वक्तव्य करत आहेत हे जनतेला माहीत आहे अशी टीका करतानाच सदाभाऊ खोत यांना गोपीचंद पडळकरांची लागण झाली आहे असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला आहे.
आतापर्यंत शांत बसलेले सदाभाऊ खोत आमदारकी मिळवण्यासाठी शरद पवार यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु कितीही सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तरी थुंक तुमच्या तोंडावरच पडणार आहे हेही लक्षात घ्या अशा स्पष्ट शब्दात तपासे यांनी सदाभाऊ खोत यांना सुनावले आहे.सांगलीशी पवार यांचा काय संबंध ? असा प्रश्न सदाभाऊ खोत यांनी केला होता त्यावर बोलताना सुर्याचा किरणांशी काय संबंध असा सवाल होऊ शकतो का ? पवार हे लोकनेते आहेत. महाराष्ट्राच्या जडणघडणीत व देशपातळीवरच्या सामाजिक,राजकीय जीवनात पवार यांचे योगदान मोलाचे आहे. या तुलनेत सदाभाऊ तुमचे योगदान काय? आणि तुम्ही कोण विचारणारे असा सवालही तपासे यांनी केला आहे.