मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कारभारावर शिवसेना नाराज असल्याची चर्चा असतानाच आता गृहमंत्री अँक्शनमोडवर आले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काही ईडी अधिकारी खंडणी रॅकेट चालवत असल्याचा गंभीर आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर ईडी अधिकाऱ्यांवर करण्यात आलेल्या आरोपांच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापन करण्यात आली आहे.अतिरिक्त पोलिस आयुक्त वीरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी काम करेल व त्यांना तपासासाठी जेवढा वेळ लागेल तेवढा देण्यात येईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडी अधिकाऱ्यांवर केलेल्या गंभीर आरोपांवर मुंबई पोलिसांची एसआयटी नेमून चौकशी करण्यात येईल असे सांगतानाच अतिरिक्त पोलिस आयुक्त वीरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी काम करेल व त्यांना तपासासाठी जेवढा वेळ लागेल तेवढा देण्यात येईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.अलीकडच्या काळामध्ये भडकाऊ भाषणे करून समाजासमाजामध्ये तेढ व संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. ही बाब राज्याच्या व देशाच्या एकतेच्या दृष्टीकोनातून बरोबर नाहीय यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत असेही गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले.नाशिकच्या पोलिस आयुक्त पत्र प्रकरणावर बोलताना सदर गोष्ट त्यांनी वरिष्ठांच्या लक्षात आणून दिली पाहिजे असे सांगितले. विरोधकांच्या मंदिरांवरून स्पीकर लावून हनुमान चालीसा लावण्याच्या प्रकरणावरून कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना पोलिस प्रशासन घेईल असेही दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.