संजय राऊत झुकेंगा नहीं ! ईडीच्या कारवायांनी संजय राऊत किंवा शिवसेना झुकणार नाही

मुंबई नगरी टीम

मुंबई । खासदार संजय राऊत यांनी काही ईडी अधिकारी खंडणी रॅकेट चालवत असल्याचा गंभीर आरोप केला होता.या पार्श्वभूमीवर ईडी अधिकाऱ्यांवर करण्यात आलेल्या आरोपांच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापन करण्याची घोषणा आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केल्यानंतर काही तासामध्येच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरच ईडीने कारवाई करीत त्यांचे अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात महत्वाची जबाबदारी पार पाडणारे आणि केंद्र सरकारकडून केंद्रिय यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप करणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत ईडी अधिकारी खंडणी रॅकेट चालवत असल्याचा गंभीर आरोप केला होता.ईडी अधिकाऱ्यांवर करण्यात आलेल्या आरोपांच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापन करण्याची घोषणा आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज केल्याच्या काही तासातच संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई करीत अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई केली आहे.मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे.

या कारवाईनंतर खासदार संजय राऊत यांनी भाजपावर प्रतिहल्ला चढवला आहे.आम्ही मालमत्ता जमवणारे आहोत का ? २००९ मध्ये कष्टाच्या पैशातून हे घर आणि जागा घेतली आहे. ही कारवाई कोणतीही नोटीस देवून करण्यात आलेली नाही असे सांगून,एक रुपया जरी अशा गैरव्यवहारातला आमच्या खात्यात आला असेल आणि त्यातून आम्ही मालमत्ता केली असेल तरी सर्व मालमत्ता भाजपाला दान करायला तयार आहे, असेही राऊत म्हणाले. अशा कारवायांमधून अजून प्रेरणा मिळते, माझे राहते घर जप्त करण्यात आले असल्याने भाजपाचे लोक उड्या मारत आहे. अशा कारवायांनी संजय राऊत किंवा शिवसेना झुकणार नाही,वाकणार नाही.याच घरात येऊन काही महिन्यांपूर्वी भाजपाच्या नेत्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी मदत करा,अशा धमक्या दिल्या होत्या.नाहीतर तुम्हाल संकटांना सामोरे जावे लागेल, असे म्हटलं होते असेही राऊत म्हणाले.

पत्रा चाळ घोटाळ्यातील संजय राऊत यांच्या सहभागाची चौकशी करा
किरीट सोमय्या यांची मागणी
संजय राऊत यांच्या मालमत्ता जप्तीच्या कारवाईवर न थांबता अंमलबजावणी संचालनालयाने गोरेगाव येथील पत्रा चाळ घोटाळ्यात राऊत यांच्या सहभागाची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली. खा.राऊत यांनी ८ महिन्यांपूर्वी अंमलबजावणी संचालनालयाकडे ५५ लाख रुपये भरून आपल्या गैरव्यवहाराची अप्रत्यक्ष कबुली दिली होती. आपल्यावर कारवाई होणार या भीतीने हबकलेल्या राऊत यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांवर आरोप करणे सुरु केले होते. माझ्या कुटुंबियांना तुरुंगात टाकण्याच्या धमक्या दिल्या गेल्या.राज्यसभा अध्यक्षांना पत्र पाठवून अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचे प्रयत्न झाले.मात्र या दबावाला न जुमानता अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी राऊत यांच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली आहे असे सोमय्या यांनी राऊत यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली.राऊत यांनी अंमलबजावणी संचालनालयाकडे ५५ लाख भरले तेंव्हाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खा. राऊत यांना जाब विचारायला हवा होता. मात्र तसे न करता ठाकरे सरकारने पोलिसांवर माझ्यावर कारवाई करण्यासाठी दबाव आणला. माझ्याविरुद्ध चौकशीसाठी कितीही एसआयटी नेमा, मी घाबरत नाही, असेही सोमय्या यांनी नमूद केले.

Previous articleशिवसेनेच्या नाराजी नंतर गृहमंत्री “अँक्शनमोडवर”; ईडी अधिकाऱ्यांवर करण्यात आलेल्या आरोपांची एसआयटी मार्फत चौकशी
Next articleसंजय राऊतांवरील कारवाईमुळे केंद्राचा कारभार कसा सुरूय हे लक्षात येतय