मुंबई नगरी टीम
मुंबई । महाविकास आघाडी हे केवळ राज्यात नाही तर देशासह संपूर्ण जगातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे, अशी टीका करत अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.त्या भाजपा मुंबई चित्रपट,नाट्य आघाडीतर्फे चित्रपट, टेलिव्हिजन व ओटीटी या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी आयोजित महारोजगार मेळाव्यात बोलत होत्या.दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात महारोजगार मेळावा पार पडला.
यावेळी फडणवीस म्हणाल्या, राज्य सरकार कमालीचे उदासीन असून एसटी कर्मचाऱ्यांचा संप पाच महिन्यांपासून अधिक काळ चालला तरी त्याच्याकडे सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही. कामगार मेटाकुटीस आलेला असताना त्यांना सरकारने मदत देणे गरजेचे असते.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचे कोणीही समर्थन करणार नाही. परंतु, अशा पद्धतीच्या घटना होण्यामागे नेमकं कारण काय आहे ? याचाही शोध घेणे गरजेचे आहे असे फडणवीस म्हणाल्या.
अभिनेते जॅकी श्रॉफ म्हणाले, कोरोनाचा चित्रपटसृष्टीशी निगडित अनेक छोट्या मोठ्या कलाकारांना मोठा फटका बसला आहे. त्यातून नैराश्यातून काही जणांनी आत्महत्या देखील केल्या आहेत. मात्र, यावर खचून न जाता सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. आयुष्य फार मोठे आहे. जीवनाचा आनंद घ्या. आयुष्य हे फार सुंदर असून त्याला इतक्या सहजतेने संपवू नका, असे आवाहनही यावेळी अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी केले. मेळाव्यात अभिनेता शिव ठाकरे, अभिनेत्री क्रांती रेडकर यांनीही नवोदित कलाकारांना मार्गदर्शन केले.मंजू लोढा, मुंबई भाजपा सचिव प्रतीक कर्पे, मुंबई भाजपा उपाध्यक्ष श्वेता परुळकर, मेघा धाडे, आरोह वेलणकर, मुकुंद कुलकर्णी तसेच फिल्म आणि टेलीव्हिजन क्षेत्राशी निगडित निर्माते, दिग्दर्शक, कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.