माझ्या चौकशीमागे महाविकास आघाडीचा छळवाद व सूडभावना; प्रविण दरेकरांचा आरोप

मुंबई नगरी टीम

मुंबई । अर्ध्या अर्ध्या तासांची त्रोटक माहिती घ्यायची असते परंतु पुनः पुनः बोलवायचे आणि चार-चार तास बसवून ठेवायचे अशी पोलिसांची सरकारच्या दबावाखाली चौकशी सुरू आहे. तेच तेच मुद्दे विचारून चौकशी करण्याचा प्रयत्न होता. छळवाद मांडायचा आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ज्या कारवाया होतायत, त्याला क्रियेला प्रतिक्रिया, अशा प्रकारची सूडभावनाच या सगळ्या गोष्टींच्या मागे आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची आज दुसऱ्यांदा माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात चौकशी करण्यात आली. दुपारी १२ च्या सुमारास प्रविण दरेकर पोलिस ठाण्यात उपस्थित राहिले. सुमारे अडीच तास दरेकर यांची पोलिसांनी चौकशी केली.त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की,पोलिसांनी आज केलेल्या चौकशीत एफआयआर संबंधित काहीही माहिती विचारली नाही. केवळ व्यक्तीगत चौकशी करण्यात आली. व्यक्तिकेंद्रित छळवाद मांडण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडी सरकारच्या दबावाखाली असलेली पोलिसांची मानसिकता आजच्या चौकशीत दिसली. मी पहिल्या दिवसांपासून सांगत आहे,आम्ही लोकशाही मानणारे भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी आहोत. आम्ही संजय राऊतांसारखे आक्रस्ताळे नाही. त्यांना चौकशीला बोलावल्यावर काय नंगा नाच करतात ते आपण पाहिले आहे. मी जेव्हा जेव्हा चौकशीला बोलावत आहेत, तेव्हा तेव्हा चौकशीला जात आहे. पण त्यांना पोलीस कस्टडी का हवी आहे. त्यांच्या नेत्यांवर ज्या कारवाई होतात. त्याला काऊंटर म्हणून आमच्यावर दबाव आणण्यासाठी हे सर्व सुरू आहे. जी माहिती अर्ध्या तासात देऊ शकतो त्यासाठी पुन्हा पुन्हा चौकशीला बोलावून तासनतास बसवून ठेवत आहेत. हा सुडाच्या भावनेतून छळवाद सुरू आहे. मात्र आम्ही कायद्याला प्रतिसाद देण्यास तयार आहोत. ज्या ज्या वेळी पोलिसांना सहकार्य लागेल तेव्हा सहकार्य करू, असे दरेकर म्हणाले.

सोमय्या पळून जाणारे नाहीत

तसेच किरीट सोमय्या सध्या कुठे आहेत,असे विचारले असता ते म्हणाले, किरीट सोमय्या पळून जाणारा माणूस नाही. तो पळवणारा नेता आहे. त्यांची न्यायालयीन प्रोसिजर सुरू आहे.तो लपणारा नेता नाही,असे उत्तर दरेकर यांनी दिले.विरोधकांच्या मनात देवेंद्र फडणवीस यांचा एवढा मत्सर आहे की त्यामुळे यांना रोज देवेंद्र फडणवीस यांचे नाव घ्यावेच लागते. त्यामुळे रोज सकाळी फडणवीसांवर टीका करायची, मोदी सरकारवर टीका करायची याशिवाय त्यांचा एकही दिवस जात नाही, असा टोलाही दरेकर यांनी लगावला.

Previous article‘मी पुन्हा येईन,मी पुन्हा येईन’च्या नादात माझे फोन टॅपिंग;खडसेंचा फडणवीसांवर निशाणा
Next articleमहाविकास आघाडीचे सरकार देशासह संपूर्ण जगातील सर्वात भ्रष्ट सरकार