मुंबई नगरी टीम
मुंबई । माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चांदीवाल आयोगाने आपला अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंगळवारी सादर केला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचा खळबळजनक आरोप केला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्यसरकारने एक सदस्यीय चांदीवाल आयोग गठीत केला होता.परमबीर सिंग आयोगासमोर कोणताही पुरावा सादर करू शकले नाहीत,तर सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांना कधीही पैसे दिलेले नाहीत,असे विधान केले, त्यामुळे माजी गृहमंत्री देशमुख यांना क्लीन चिट मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचा आरोपाची चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले असताना,राज्य सरकारने समांतर तपासासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय आयोगाची स्थापना केली होती.आयोगाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख,मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग,सचिन वाझे,उपायुक्त संजय पाटील यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले होते.मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग एका शपथपत्रांद्वारे आयोगाला सांगितले की, मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात दिलेल्या माहितीशिवाय आपल्याकडे काहीही नाही.अनिल देशमुख यांना कधीही पैसे दिले नाहीत असे वक्तव्य सचिन वाझे यांनी आयोगासमोर केले.फेब्रुवारी २०२१ मध्ये,उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर वाहनात स्फोटके सापडली होती.या घटनेनंतर परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली होती,देशमुख यांनी पोलीस अधिका-यांना बार आणि रेस्टॉरंट चालकांकडून दरमहा १०० कोटी रुपये उकळण्याचे निर्देश दिल्याचा आरोप त्यांनी केला होता.परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडाली होती.या प्रकरणामुळे देशमुख यांचा राजीनामा घ्यावा लागला होता.नोव्हेंबरमध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात देशमुख यांना अटक करण्यात आली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.देशमुख प्रकरणी विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता,राजकीय दबाव वाढल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी चांदीवाल आयोगाची स्थापना केली.