मुंबई नगरी टीम
मुंबई । योगी कोण आणि भोगी कोण यासंदर्भात राज ठाकरे यांचे मतपरिवर्तन कसे झाले,हा एक संशोधनाचा विषय असून राज ठाकरे यांनी वेळोवेळी बदललेल्या भुमिकांवरुन एखाद्याला पीएचडी करता येईल अशी चपराक शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्याची मोहिम हाती घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांचे कौतुक करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले, योगी सरकारने फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले आहे. अशा प्रकारच्या आदेशाचे पालन महाराष्ट्रात करावे ही सरकारची भूमिका आहे. महाराष्ट्र सरकार नेहमीच न्यायालयाच्या आदेशाचे पालन करते असे स्पष्टीकरण राऊत यांनी दिले आहे.भोंग्याच्या मुद्द्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट करताना विरोधकांना अशांतता निर्माण करून लोकांची दिशाभूल करायची आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी भाजपवर केला. भोंग्याच्या प्रश्नाबद्दल राज्यातील सर्व पक्षांना सरकारने चर्चेला बोलावले होते. सर्वांनी मिळून निर्णय घेऊ असे ठरले होते, मात्र या बैठकीवर भाजपने बहिष्कार टाकला याकडे त्यांनी लक्ष वेधले.