मुंबई नगरी टीम
मुंबई । कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षापासून सर्वसामान्यांसाठी बंद असलेली मंत्रालयाची दारे उद्यापासून (१८ मे ) उघडली जाणार आहेत.यासंदर्भातील आदेश गेल्या काही दिवसापूर्वी जारी करण्यात आला आहे.या निर्णयामुळे आता दुपारी दोन नंतर सर्व सामान्य जनतेला मंत्रालयात प्रवेश देण्यात येणार आहे.
राज्यात दोन वर्षापूर्वी मार्च महिन्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढल्यामुळे राज्यात टाळेबंदी लागू केली होती.मंत्रालयात कोरोनाचा शिरकाव झाल्याने आणि रूग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर १६ मार्च २०२० पासून सर्वसामान्यांना मंत्रालयातील प्रवेश बंद करण्यात आला होता.मंत्रालयासह शासकीय कार्यालयांमधील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थितीही मर्यादित ठेवण्यात येवून मंत्रालयाबाहेरील शासकीय अधिकाऱ्यांना आणि सर्वसामान्य जनतेला मंत्रालयातील प्रवेश बंद करण्यात आला.केवळ अतिमहत्त्वाच्या व्यक्ती व तातडीच्या बैठकांसाठी आमंत्रित केलेल्या व्यक्तींना मंत्रालयात प्रवेश दिला जात होता.गुढीपाडव्याच्या दिवशी राज्यातील कोरोना संदर्भातील सर्व बंधने हटविण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.मात्र मंत्रालयातील प्रवेश बंदच होते.राज्याच्या मुख्यालयात आपली गा-हाणे घेवून येणा-यांना मंत्रालयात प्रवेश देण्याची मागणी सर्वसामान्यांकडून होत होती.त्या पार्श्वभूमीवर तब्बल दोन वर्षांनंतर १८ मेपासून सामान्य जनतेसाठी मंत्रालयाची दारे उघडी जाणार आहेत.या निर्णयामुळे दुपारी २ नंतर सर्व सामान्य जनतेला मंत्रालयात प्रवेश दिला जाणार आहे.