नव्या चेह-यांसह देवेंद्र फडणवीसांच्या दोन विश्वासू सहका-यांना आणि एका ओएसडीला संधी

मुंबई नगरी टीम

मुंबई । माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी अभिमन्यू पवार यांना गेल्या विधानसभेत संधी दिल्यानंतर आता दुसरे विशेष कार्य अधिकारी श्रीकांत भारतीय यांना भाजपने विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे.श्रीकांत भारतीय यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी ओळख असलेले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.औसा विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यानंतर आता दुसरे विशेष कार्य अधिकारी श्रीकांत भारतीय विधानपरिषदेवर जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानपरिषदेसाठी भाजपने माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना पुन्हा विधानपरिषदेसाठी संधी दिली आहे.मात्र माजी मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारली आहे.माजी मंत्री राम शिंदे यांना उमेदवारी देतानाच भाजपने महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय यांना संधी दिली आहे.भाजपने विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात पाचवा उमेदवार उतरविल्याने राज्यसभेप्रमाणे विधानपरिषदेची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.आज जाहीर करण्यात आलेल्या यादीत फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांचा समावेश आहे.राज्यात भाजप शिवसेनेची सत्ता असताना देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी अभिमन्यू पवार यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत औसामधून उमेदवारी देण्यात आली होती.या निवडणुकीत पवार हे मोठ्या मतांच्या फरकाने विजयी झाले होते. आता फडणवीस यांचे त्यावेळेचे दुसरे विशेष कार्य अधिकारी श्रीकांत भारतीय यांना भाजपने विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिली असल्याने ते विधानपरिषदेवर जाणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.देवेंद्र फडणवीस हे आमचे कुटुंब प्रमुख असून आम्ही त्यांचे संताजी धनाजी आहोत असे जाहीरपणे सांगणारे प्रसाद लाड आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे फडणवीसांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात.त्यामुळे नव्या चेह-यांना उमेदवारी देतानाच फडणवीस यांनी सहका-यांना सुद्धा संधी दिल्याची चर्चा आहे.

विधानपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य रामराजे नाईक निंबाळकर,संजय दौंड,शिवसेनेचे सदस्य आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई,दिवाकर रावते, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,सदाभाऊ खोत, विनायक मेटे,सुजितसिंह ठाकूर,प्रसाद लाड हे सदस्य निवृत्त होत असल्याने तर भाजपचे रामनिवास सिंह यांचे निधन झाल्याने एक जागा रिक्त असल्याने १० जागांसाठी येत्या २० जून रोजी निवडणूक होत आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उद्या ( गुरूवार ) शेवटी मुदत आहे.संख्याबळानुसार भाजपच्या चार जागा सहज निवडून येवू शकतात.मात्र भाजपने राज्यसभेप्रमाणे विधानपरिषदेच्या निवडणुकीत अधिकचा उमेदवार दिला आहे.उमा खापरे या उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असून,प्रवीण दरेकर,प्रसाद लाड,राम शिंदे आणि श्रीकांत भारतीय यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले.

Previous articleसुभाष देसाईंना उमेदवारी नाहीच;आदित्य ठाकरेंना निवडणूक सोपी जावी म्हणून सेनेत गेलेल्या सचिन अहिरांचे पुनर्वसन
Next articleमविआला धक्का; शिवसेनेचे संजय पवार पराभूत,भाजपचे धनंजय महाडिक विजयी