मविआला धक्का; शिवसेनेचे संजय पवार पराभूत,भाजपचे धनंजय महाडिक विजयी

मुंबई नगरी टीम

मुंबई । अत्यंत चुरशीच्या झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने राज्यातील महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे.या निवडणुकीत भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले आहेत.तर शिवसेनेचे संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.या निवडणुकीत काही छोटे पक्ष आणि अपक्षांनी महाविकास आघाडी ऐवजी भाजपला साथ दिल्याचे दिसते.महाविकास आघाडीने त्यांच्याकडे १२ अपक्ष आमदार असल्याचा दावा केला होता,मात्र प्रत्यक्षात १० अपक्ष आमदारांना फोडण्यात भाजपला यश आल्याचे निकालावरून स्पष्ट होते.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या आणि अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे.महाविकास आघाडीच्या तीन मतांवर भाजपने आक्षेप घेतल्याने मतमोजणी सुमारे ९ तासानंतर सुरू झाली.या निवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला धक्का दिल्याचे स्पष्ट झाले आहे.भाजपच्या उमेदवारांना पहिल्या पसंती पेक्षा जास्त मते मिळाल्याने भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक विजय झाले आहेत. तर शिवसेनेचे संजय पवार पराभूत झाले आहेत.पहिल्या फेरीत त्यांना ३३ मत मिळाली होती. तर, धनंजय महाडिक यांना २७ मत मिळाली मात्र, दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे.धनंजय महाडिक यांना ४१.५ मते मिळाली,केंद्रीयमंत्री पीयुष गोयल आणि अनिल बोंडे यांना ४८ मते मिळाली शिवसेनेचे संजय राऊत यांना ४१,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल यांना ४३ तर काँग्रेसचे इमरान प्रतापगढी यांना ४४ मते मिळाली.हे सर्व पहिल्या फेरीत विजयी झाले.राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीसोबत असलेल्या काही अपक्ष आमदारांना फोडण्यात भाजपला यश आल्याचे या निकालावरून स्पष्ट होते.भाजपचे १०६ आमदार आहेत.त्यामुळे भाजपला अधिकची १७ मते फोडण्यात यश आले आहे.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या राज्यसभा निवडणुकीत प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी),संजय राऊत (शिवसेना), पीयूष गोयल (भाजपा),इम्रान प्रतापगढी (काँग्रेस),अनिल बोंडे (भाजपा),हे पहिल्याच फेरीत विजयी झाले आहेत.पीयुष गोयल आणि अनिल बोंडे यांना ४८ मते मिळाली शिवसेनेचे संजय राऊत यांना ४१,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल यांना ४३ तर काँग्रेसचे इमरान प्रतापगढी यांना ४४ मते मिळाली.तर या निवडणुकीत भाजपचे धनंजय महाडिक हे विजयी झाले आहेत.त्यांनी शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव केला आहे. संजय पवार आणि धनंजय महाडिक यांचे राजकीय भविष्य छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांवर अवलंबून होते.राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सकाळी ९ वाजता मतदानाला सुरूवात झाली.दुपारी ४ वाजेपर्यंत एकूण २८५ आमदारांनी मतदान केले.अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना न्यायालयाने मतदानासाठी परवानगी नाकारल्याने महाविकास आघाडीला मोठा फटका बसला.मतदानाच्यावेळी काँग्रेसच्या आमदार आणि बाल व महिला विकासमंत्री यशोमती ठाकूर,शिवसेनेचे आमदार सुहास कांदे आणि राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मतावर भाजपचे पराग अळवणी आणि अतुल सावे यांनी आक्षेप घेत त्यांची मते बाद करण्याची मागणी केली.महाविकास आघाडीचे मते बाद ठरवावी अशी मागणी करणारे पत्र भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवल्याने मतमोजणीस विलंब लागला.सांयकाळी ५ वाजता सुरू होणारी मतमोजणी तब्बल ९ तासांच्या विलंब झाल्याने उमेदवारांसह सर्वच पक्षांच्या नेत्यांचा जीव टांगणीला लागला होता.

मतमोजणीला तब्बल ९ तासांचा विलंब

अत्यंत चुरशीच्या झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीची मतमोजणी ५ वाजता सुरू होणार होती. मात्र सुहास कांदे,यशोमती ठाकूर आणि जितेंद्र आव्हाड यांनी मतपत्रिका दुस-यांना दाखवली असा आक्षेप घेत त्यांचे मत रद्द करण्याची मागणी भाजपने केली होती.याबाबत भाजपने याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवून मतमोजणीत तीन मते बाद करावी अशी मागणी केली होती.मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे सुहास कांदे यांचे मत बाद ठरविण्याचा निर्णय घेतला तर यशोमती ठाकूर आणि जितेंद्र आव्हाड यांचे मत ग्राह्य धरत मतमोजणीली परवानगी दिली.

२८५ आमदारांनी केले मतदान

राज्यसभेच्या सहा जागांसाठी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत आज एकूण २८५ आमदारांनी भाग घेतला.नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना न्यायालयाने मतदानाला परवानगी नाकारल्याने महाविकास आघाडीला दोन मतांचा फटका बसला.२८८ सदस्य असलेल्या विधानसभेत सध्या २८७ आमदार आहेत.शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने विधानसभेत २८७ आमदार आहेत.शिवाय नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानास परवानगी दिली गेली नसल्याने एकूण २८५ आमदारांनी मतदान केले. देशमुख आणि मलिक यांची मते बुडाल्याने महाविकास आघाडीचे मतांचे गणित बिघडले.तर शिवसेनेचे सुहास कांदे यांचे मत बाद ठरल्याने मविआला मोठा झटका बसला आहे.

गंभीर आजाराने त्रस्त्र असलेल्या आमदारांनी केले मतदान

राज्यसभेच्या निवडणुकीत अत्यंत चुरस निर्माण झाल्याने प्रत्येक आमदारांच्या मताला महत्व आले होते.पुण्यातील पिंपरीचे भाजपचे आमदार गंभीर आजाराने त्रस्त्र असून,त्यांना मतदानासाठी रूग्ण वाहिकेतून आणण्यात आले होते.तसेच पुण्यातीलच कसबा पेठच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक या कर्करोगाशी झुंज देत आहेत. अशा परिस्थितीत त्यांनाही रूग्ण वाहिकेतून मतदानासाठी आणण्यासाठी आले होते.अलिबागचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.अशाही परिस्थितीत ते वॅाकरच्या मदतीने ते मतदानासाठी विधानभवनात पोहचले.

यशोमती ठाकूर, जितेंद्र आव्हाड,सुहास कांदे यांच्या मतावर आक्षेप

काँग्रेसच्या आमदार आणि बाल व महिला विकासमंत्री यशोमती ठाकूर,शिवसेनेचे आमदार सुहास कांदे आणि राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मतावर भाजपचे पराग अळवणी आणि अतुल सावे यांनी आक्षेप घेतला.जितेंद्र आव्हाड,यशोमती ठाकूर यांनी मतपत्रिका निवडणूक प्रतिनिधीच्या हातात दिल्याचा तर शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी मतपत्रिका दोन्ही निवडणूक प्रतिनिधीला दिसेल अशी दाखवल्याचा आक्षेप घेण्यात आला.तर भाजपचे आमदार सुधीर मुगंटीवार यांनी मतपत्रिका आशिष शेलार यांच्या हातात दिल्याचा आक्षेप घेण्यात आला.जितेंद्र आव्हाड,यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांची मते बाद ठरवावी अशी मागणी अळवणी आणि सावे यांनी निवडणूक अधिका-यांकडे केली होती

अनिल देशमुख आणि नवाब मलिक मतदानास मुकले

सध्या तुरूंगात असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करता आले नाही.या दोन्हाकडून मतदानास परवानगी मागण्यात आली होती. मात्र त्यांची मागणी विशेष न्यायालयाने फेटाळली.न्यायालयाच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला.देशमुख आणि मलिक यांना मतदान करता आले नसल्याने मतांचा कोटा कमी झाल्याने महाविकास आघाडीच्या अडचणींमध्ये भर पडली.

एमआयएमची महाविकास आघाडीला साथ

अत्यंत चुरशीच्या झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत प्रत्येक मताला महत्व आले होते.दोन मते असणा-या एमआयएम पक्षाचे आमदार कोणाला मत देणार याकडे लक्ष लागले होते.अखेर एमआयएमने महाविकास आघाडीला साथ देण्याची घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा जीव भांड्यात पडला होता.महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सहभागी असणाऱ्या शिवसेनेसोबत आमचे राजकीय आणि वैचारिक मतभेद कायम राहतील असे खासदार इम्तियाज जलील म्हटले.आमच्या आमदारांच्या मतदारसंघात विकास व्हावा यासाठी आम्ही काही अटी ठेवल्या.महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे उत्पन्न वाढवण्यासाठी पावले उचण्याची मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय मुस्लिमांसाठी आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे.आमच्या दोन आमदारांना काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना मतदान करण्यास सांगण्यात आले आहे असे जलील म्हणाले.

समाजवादी पक्ष महाविकास आघाडी सोबत

राज्यसभा निवडणुकीत एमआयएमने महाविकास आघाडीला मत देण्याचा निर्णय घेतल्यानंतर समाजवादी पक्षाने देखिल महाविकास आघाडीला साथ देण्याचा निर्णय घेतला.समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि रईस शेख यांनी महाविकास आघाडील मत देणार असल्याचे स्पष्ट केले. आमचे मत धर्मनिरपेक्ष असून, आमचे मत भाजपच्या विरोधात आहे अशी प्रतिक्रिया सपाचे आमदार रईस शेख यांनी दिली.

Previous articleनव्या चेह-यांसह देवेंद्र फडणवीसांच्या दोन विश्वासू सहका-यांना आणि एका ओएसडीला संधी
Next articleबिनविरोधाचे प्रयत्न फसले; पुन्हा भाजप विरूद्ध महाविकास आघाडी ‘सामना’ रंगणार