बिनविरोधाचे प्रयत्न फसले; पुन्हा भाजप विरूद्ध महाविकास आघाडी ‘सामना’ रंगणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बसलेल्या धक्क्यानंतर येत्या २० जून रोजी होणा-या विधान परिषदेच्या निवडणुकीत दुसरा उमेदवार निवडून आणण्याचे काँग्रेसपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी रयत क्रांती संघटनेचे आणि भाजप पुरस्कृत सदाभाऊ खोत आणि राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे यांनी माघार घेतल्याने विधान परिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिल्याने या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे.राज्यसभेच्या निवडणुकीत अविश्वास दाखवल्याने अपक्षांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी समोर सहावा उमेदवार निवडून आणण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज रयत क्रांती संघटनेचे आणि भाजप पुरस्कृत उमेदवार सदाभाऊ खोत आणि राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे यांनी माघार घेतली आहे.या दोन उमेदवारांच्या माघारीनंतर राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे,भाजपच्या उमा खापरे,प्रवीण दरेकर,प्रसाद लाड,राम शिंदे आणि श्रीकांत भारतीय,शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी आणि काँग्रेसचे भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.विधान परिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार असल्याने ही निवडणूक चुरशी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.राज्यसभा निवडणुकीत खुल्या मतदान पद्धतीत अपक्षांची मोठ्या प्रमाणात मते फुटली असल्याचे स्पष्ट झाले आहे.विधान परिषद निवडणुकीसाठी गुप्त मतदान पद्धत असल्याने याही निवडणुकीत फटका बसण्याची भिती सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला आहे.विधान परिषद निवडणुकीत विजयी होण्यासाठी पहिल्या पसंतीची २५.९१ मतांची आवश्यकता आहे.काँग्रेस ४४ आमदार असून, चंद्रकांत हंडोरे यांना पहिल्या फेरीत विजयी करावयाचे झाल्यास त्यांना २६ मते द्यावी लागतील.काँग्रेसकडे १८ मते उरतात त्यामुळे त्यांना दुसरा उमेदवार विजयी करण्यासाठी अजून ८ मतांची आवश्यकता आहे.शिवसेनेचे ५४ आमदार असल्याने दोन उमेदवार पहिल्या फेरीत विजयी होवू शकतात.राष्ट्रवादीचे ५३ आमदार असल्याने त्यांचेही दोन उमेदवार पहिल्याच फेरीत विजयी होवू शकतात.भाजपचे १०६ आमदार असून त्यांच्याकडे काही अपक्षांचे पाठबळ असल्याने त्यांच्या चार जागा सहज निवडून येवू शकतात.त्यांना पाचव्या उमेदवारांसाठी काही मतांची आवश्यकता असून,त्याचे गणित अपक्षांवर अवलंबून आहे.त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसला मोठे आव्हान असणार आहे.राज्यसभा निवडणूकीनंतर महाविकास आघाडीत एकी राहिली नसल्याचे चित्र आहे.अपक्षांच्या फुटलेल्या मतांवरून खासदार संजय राऊत यांनी अपक्षांना उघड उघड सुनावल्याने अपक्ष आमदार नाराज आहेत.त्यामुळे याही निवडणुकीत अपक्षांचा फटका बसण्याची भिती महाविकास आघाडीला आहे.

सध्या विधानसभेत असलेल्या संख्याबळानुसार शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी दोन तर काँग्रेसची एक जागा सहज निवडून येवू शकते.या निवडणुकीत भाजपने पाच उमेदवार उभे केले आहेत.सध्या भाजपचे संख्याबळ १०६ आहे.भाजपला पाचवी जागा निवडून येण्यासाठी १३० मतांची गरज आहे.राज्यसभेत भाजपाला पहिल्या पसंतीची १२३ मते मिळाली आहेत.विधान परिषद निवडणुकीत गुप्त मतदान पद्धत असल्याने भाजपला अजून पाच ते सहा मतांची आवश्यकता आहे.राज्यसभा निवडणुकीत भाजपला अपक्षांनी साथ दिल्याचे स्पष्ट झाल्याने या निवडणुकीत अपक्षांना आपल्याकडे खेचण्याची भाजपने आत्तापासूनच कंबर कसली आहे. राज्यसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल लागल्याने ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चिन्ह आहे.विधानसभेत राष्ट्रवादीचे ५३,काँग्रेसचे ४४,शिवसेनेचे ५४,भाजपचे १०६ संख्याबळ आहे.तर १३ अपक्ष आमदार आहेत.विधानसभेत बहुजन विकास पक्ष ३, समाजवादी पार्टी २,एमआयएम २, प्रहार जनशक्ती पक्ष २,मनसे १, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ( मार्क्सवादी) १,शेतकरी कामगार पक्ष १, स्वाभिमानी पक्ष १, राष्ट्रीय समाज पक्ष १, जनसुराज्य शक्ती पक्ष १.क्रांतिकारी शेतकरी पक्ष १, असे छोट्या पक्षांचे एकूण १६ आमदार आहेत.

Previous articleमविआला धक्का; शिवसेनेचे संजय पवार पराभूत,भाजपचे धनंजय महाडिक विजयी
Next articleविधान परिषदेच्या ५ जागा जिंकू ; राज्यसभा निवडणूकीतनंतर फडणवीसांचे मविआला आव्हान