विधान परिषदेच्या ५ जागा जिंकू ; राज्यसभा निवडणूकीतनंतर फडणवीसांचे मविआला आव्हान

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला धक्का देत भाजपने तिसरा उमेदवार जिंकून आणल्यानंतर आता येत्या २० जून रोजी होणा-या विधान परिषदेच्या निवडणुकीत पाचवा उमेदवार निवडून आणू असा विश्वास व्यक्त करीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला आव्हान दिले आहे.

आज पत्रकार परिषदेत बोलताना विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी महाविकास आघाडीला उघड उघड आव्हान दिले आहे.राज्यसभा निवडणुकीत भाजपने तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांना विजयी करण्याचा करिष्मा केला होता. महाविकास आघाडीला साथ देणा-या अपक्ष आमदारांना फोडण्यात भाजपला यश आल्यानंतर महाविकास आघाडीत एकी राहिली नसल्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या या आव्हानाला महत्व प्राप्त झाले आहे विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज रयत क्रांती संघटनेचे आणि भाजप पुरस्कृत उमेदवार सदाभाऊ खोत आणि राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे यांनी माघार घेतली आहे.या दोन उमेदवारांच्या माघारीनंतर राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर,एकनाथ खडसे,भाजपच्या उमा खापरे,प्रवीण दरेकर,प्रसाद लाड,राम शिंदे आणि श्रीकांत भारतीय,शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी आणि काँग्रेसचे भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.विधान परिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार असल्याने ही निवडणूक चुरशी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

विधानपरिषद निवडणूक निवडणूक बिनविरोध होईल,अशी आमची अपेक्षा होती. पण सत्ताधारी पक्षांना त्यात यश मिळू शकले नाही. काँग्रेसने नकार दिल्याने ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. आमचे ५ उमेदवार आहेत. आम्ही सर्व ५ जागा जिंकू, हा पूर्ण विश्वास आहे, असेही त्यांनी सांगितले.ओबीसी आरक्षणासंदर्भात एम्पिरीकल डेटा गोळा करण्याच्या कामात प्रचंड गोंधळ सुरू आहे.ओबीसींची संख्या घटलेली दिसेल,अशा पद्धतीने हे काम होते आहे असा आरोप त्यांनी केला.हे सरकार नेहमीच उशिरा जागे होते,म्हणून मी आजच सरकारला इशारा देतो आहे.याचा संपूर्ण तपशील योग्य वेळी मी देईनच. मध्यप्रदेश सरकारने प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्रपणे काम केले.एकदा हे सर्वेक्षण पूर्ण होऊन,न्यायालयात सादर झाले की मग त्यातून माघार घेता येणार नाही आणि ओबीसींचे कायमस्वरूपी आणि मोठे नुकसान झालेले असेल.त्यामुळे आजच सावध व्हा.अन्यथा भाजपला पुन्हा मैदानात उतरावे लागेल, असा इशारा विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी दिला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दिल्ली उच्च न्यायालयाच्या निरीक्षणानंतर चौकशी होत असेल तर त्याला सामोरे जायला हवे. सामान्य जनतेला अकारण वेठीस धरण्याचा प्रयत्न करु नये. काँग्रेसच्या या कृतीचा आम्ही निषेध करतो, असेही ते म्हणाले.राहुल गांधी यांना ईडी चौकशीसाठी बोलाविले असताना आज काँग्रेस पक्षाने विविध शहरात जनतेला वेठीस धरले.ही चौकशी न्यायालयाच्या निर्णयानंतर झाली आहे. एजेएल ही कंपनी १९३० च्या दशकात ५००० स्वातंत्र्य सैनिकांनी एकत्र येत स्थापन केली. मात्र,२०१० मध्ये यंग इंडिया कंपनीची स्थापना करीत या कंपनीचे सर्व समभाग हस्तांतरित करण्यात आले आणि सुमारे २००० कोटी रुपयांची मालमत्ता हडप करण्यात आली. हा प्रश्न न्यायालयात गेला तेव्हा २०१९ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने अतिशय गंभीर आक्षेप त्यावर नोंदविले आहेत आणि हा भ्रष्टाचार आहे, असे सांगितले आहे. पण, आज जणू आपण निर्दोष आहोत, असे भासविण्याचे काम होते आहे. काँग्रेसने बाऊ करण्याऐवजी चौकशीचा थेट सामना करावा. आमचे आदर्श स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जन्मठेपेच्या २ शिक्षा भोगल्या. आज त्यांच्याविरोधात फलकं लावून राहुल गांधी आणि काँग्रेस त्यांचा अपमान करते आहे. स्वतः २००० कोटी रुपयांची मालमत्ता हडप करायची आणि वीर सावरकर यांचा अपमान करायचा, हे निषेधार्ह आहे. त्यांनी देशाची माफी मागायला हवी, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

Previous articleबिनविरोधाचे प्रयत्न फसले; पुन्हा भाजप विरूद्ध महाविकास आघाडी ‘सामना’ रंगणार
Next articleहम डरेंगे नहीं, लडेंगे और जितेंगे ; काँग्रेसचा केंद्रातील भाजप सरकारला इशारा