मुंबई नगरी टीम
मुंबई । जे कधीही जनतेतून निवडून आले नाहीत असे संजय राऊत हे शरद पवार यांच्या गळ्यातील ताईत आहेत.ते शिवसेना पक्ष संपवायला निघाले आहेत,असा आरोप शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी केला.संजय राऊत यांचे ऐकून पक्ष चालणार असेल,आमच्यासारख्या अनेकवेळा जनतेतून निवडून येणाऱ्या आमदारांना दूर ढकलले जाणार असेल तर करायचे तरी काय ? असा सवालही केसरकर यांनी केला आहे.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेल्या दीपक केसरकर यांचे एक पत्र आज शिंदे गटाकडून प्रकशित करण्यात आले.या पत्रात केसरकर यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमच्यात दरी वाढविण्याचे पाप संजय राऊत यांनी केले आहे.राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी बंदूक चालवायची,खांदा संजय राऊतांचा वापरायचा आणि त्यातून मारले जाणार कोण तर पक्षाचे शत्रू नव्हे तर आपणच आणि हे आम्हाला मान्य नाही, असे केसरकर यांनी म्हटले आहे.२०१४ ची लोकसभा निवडणूक शिवसेना भाजपने एकत्र लढवली.विधानसभा निवडणूक सुद्धा एकत्र लढण्याचे ठरले होते. मात्र युवा नेते आदित्य ठाकरे यांनी मिशन १५१ प्लस अशी घोषणा केली. वाटाघाटी केल्यानंतर भाजप १२७ आणि शिवसेना १४७ जागा असे सूत्र निश्चित झाले होते. मात्र, शिवसेनेकडून चार जागांचा आग्रह काही सोडण्यात आला नाही. शेवटी जे व्हायला नको होते ते झाले आणि दीर्घकाळाची युती तुटली, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा युती झाल्यानंतर संजय राऊत यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका करण्याचा विषारी क्रम प्रारंभ केला. केंद्रात मोदींच्या मंत्रिमंडळात रहायचे, राज्यातील सरकारमध्ये घटक पक्ष म्हणूनही रहायचे आणि मोदीवर जहरी टीका करायची यातून दोन पक्षातील दरी वाढविण्याचे काम पद्धतशीरपणे करण्यात आले. दररोज अश्लाघ्य शब्दात टीका व्हायची. कॉंग्रेस ,राष्ट्रवादी कॉंग्रेस किंवा देशातील अन्य विरोधी पक्ष सुद्धा जी भाषा वापरत नाहीत ती भाषा आमच्या संजय राऊत यांच्या तोंडी कायम होती. या काळात आम्ही सर्व आमदारांनी ही बाबा वेळोवेळी पक्ष नेतृत्वाच्या लक्षात आणून देण्याचे काम करत होतो. पण त्याचा काहीच परिणाम होत नव्हता, असे केसरकर यांनी म्हटले आहे.आमचा लढा हा शिवसेनेचा आहे,शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा आहे. लढा शिवसेनेच्या अस्तित्वाचा, मराठी आणि हिंदूत्वाच्या अस्मितेचा आहे. हे बंड नाही तर शिवसेनेच्या आत्मसन्मानाचा लढा आहे आणि तो जिंकल्याशिवाय माघार नाही,असे दीपक केसरकर यांनी पत्रात म्हटले आहे.