मुंबई नगरी टीम
मुंबई । शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्या गटात सहभागी झालेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील गुवाहटीतील एका संवादामुळे चांगलेच चर्चेत राहिले.गुवाहटीतील निसर्गाचे वर्णन करताना,काय झाडी,काय डोंगार, काय हाटील..एकदम ओके या त्यांचा हा संवाद संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला.त्यांच्या या संवादाची प्रसिद्धी कायम असल्याचा प्रत्यय आज विधानसभेत आला आणि शहाजीबापू पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला होता.मुंबई मार्ग सुरत आणि सुरतहून या बंडखोर आमदारांना गुवाहटीतील पंचतारांकित हॅाटेल मध्ये ठेवण्यात आले होते.या बंडखोर आमदारांमध्ये सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचाही समावेश होता. गुवाहटीतील मुक्कामाबद्दल बोलताना पाटील म्हणाले की,काय झाडी,काय डोंगार,काय हाटील..एकदम ओके असे त्यांनी तेथिल निसर्गाचे वर्णन केले होते. त्यांचा हा संवाद चांगलाच चर्चेत राहिला.समाज माध्यमात हा संवाद बेफाम व्हायरल झाला.राज्यात शिंदे- फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यावर आज विधानसभेच्या अध्यक्षांची निवडणूक पार पडली.यावेळी आमदारांना आपल्या जागेवर उभे राहून आपला क्रमांक सांगून मतदान करावे लागत होते.मतदानावेळी शहाजी पाटील यांचा नंबर आला तेव्हा विरोधी बाकावरील सदस्यांनी एका सूरात ‘काय झाडी,काय डोंगार,काय हाटील’असा संवाद म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.तर भायखळाच्या आमदार यामिनी जाधव उभे राहताच ईडी ईडी अशा घोषणा दिल्या.यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभाग आणि ईडीने कारवाई केली होती.