मतदानावेळी गॅलरीतून मिलिंद नार्वेकर यांच्यासह शिवसेनेच्या बड्या नेत्यांचा वॅाच !

मुंबई नगरी टीम

मुंबई । शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पाय उतार व्हावे लागले तर शिवसेनेच्या तब्बल ३९ आमदारांनी बंड केल्याने शिवसेनेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.राज्यात नव्यानेच आलेल्या शिंदे- फडणवीस सरकारच्या अग्निपरिक्षेतील पहिली परिक्षा आज विधानसभेत झाली.अध्यक्षपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते तर बंडखोर आमदार काय भूमिका घेतात याकडे विधानसभेच्या गॅलरीतून उद्धव ठाकरे यांचे सचिव आणि शिवसेनेचे बडे नेते नजर ठेवून होते.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड केल्याने शिवसेनेपुढे अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला असतानाच आज झालेल्या विशेष अधिवेशनाकडे शिवसेनेच्या नेत्यांचे लक्ष लागले. होते.अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होती.यावेळी भाजप आणि शिवसेनेचे बंडखोर आमदारांनी भगवे फेटे परिधान करून सभागृहात प्रवेश केला.यावेळी या आमदारांनी,आनंद दिघे यांचा विजय असो,जय भवानी जय शिवाजी, वंदे मातरम अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडले.अध्यक्ष निवडीवेळी बंडखोर प्रत्यक्षात काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते.या घडामोडी घडत असतानाच विधानभवनाच्या गॅलरीत माजी मंत्री अनिल परब,उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकर,खा. अनिल देसाई ,खा.अरविंद सांवत,खा. विनायक राऊत, आमदार सचिन अहिर हे या घडामोडींकडे बारीक नजर ठेवून होते.शिवसेनेचे आमदार तसेच युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची भाषणे त्यांनी ऐकली.अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते यांचीही भाषणे त्यांनी कान देवून ऐकली.मात्र अपेक्षित कोणतीच गोष्ट घडली नसल्याने नंतर त्यांनी गॅलरीतून काढता पाय घेतला.

Previous articleशहाजी पाटलांच्या मतदानावेळी’काय झाडी,काय डोंगार,काय हाटील’,यामिनी जाधवांवेळी ईडी…ईडी
Next articleफडणवीसांना मुख्यमंत्री केलं नाही म्हणून भाजपाचे नेते ढसाढसा रडायला लागले… अजितदादांची तुफान बॅटिंग