मुंबई नगरी टीम
मुंबई । शिवसेनेतून बंडखोरी करून राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले कडवट शिवसैनिक एकनाथ शिंदे आणि यापूर्वी सत्तेत असलेले आणि आज विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड झालेले अजित पवार यांच्यात आगामी काळात राजकीय सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाली आहे.अजित पवार यांचा स्वभाव रोखठोक आणि स्पष्ट असल्याने सभागृहातील चुकीच्या गोष्टी व सरकारकडून राहिलेल्या त्रुटींवर समर्थपणे बोट ठेवण्याचे काम ते करतील असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितल्याने भविष्यात “भाई” विरूद्ध “दादा” असा राजकीय आखाडा रंगणार आहे.
शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंडखोरी करीत भाजपशी युती करीत राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ओळख कडवट शिवसैनिक म्हणून आहे.राज्यातील शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर काल झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आणि आज झालेल्या बहुमत चाचणीत शिंदे सरकारने बाजी मारली आहे.शिंदे यांच्या सोबत आलेले आमदार हे आक्रमक आमदार आहेत.शिवाय सभागृहात त्यांना यापुढील काळात भाजपच्या आमदारांची भक्कम साथ मिळणार असल्याने शिंदे-फडणवीस हे दोन्ही नेते आक्रमक होणार यात शंका नाही.तर आज विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख आहे.विधानसभेतील कामकाजाचा दिर्घ अनुभव तसेच प्रशासकिय कामात हातखंडा असलेले अजित पवार हे राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारला अडचणीत पकडण्याची संधी सोडणार नाही.गेल्या अडीच वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळालेल्या वागणूकीमुळे शिंदे प्रचंड नाराज आहेत.शिवाय विकास निधी वाटपात दोन्ही काँग्रेसकडून सापत्न वागणूक मिळाली असल्याने भविष्यात याचा बदला घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.शिंदे सरकार विराजमान होताच कांजूरमार्ग येथिल मेट्रो कारशेड पुन्हा आरे मध्ये हालविण्याचा निर्णय सरकारने घेतला शिवाय महाविकास आघाडी सरकारने घेतलेले काही निर्णय या सरकारने रद्द केल्याने येत्या पावसाळी अधिवेशनात भाई विरूद्ध दादा असा सामना रंगणार आहे.
शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार यांनी केलेले काम हे पुढील काळात लक्षात राहिलच शिवाय राज्यातील साडेबारा कोटी जनतेला न्याय देण्यासाठी विरोधी पक्षनेता म्हणून अजित पवार काम करतील असा विश्वास करतानाच अजित पवार यांचा स्वभाव रोखठोक आणि स्पष्ट असल्याने सभागृहातील चुकीच्या गोष्टी व शासनाकडून राहिलेल्या त्रुटींवर समर्थपणे बोट ठेवण्याचे काम ते करतील असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अजित पवार यांच्या निवडीनंतर केलेल्या भाषणात सांगितले.एखादा निर्णय त्वरीत घ्यायचा असताना ३०-३५ वर्षांचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव उपयोगी पडेल.अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद भूषविले आहे. तसेच अर्थमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले आहे. प्रत्येक खात्यातील बारकावे समजण्यात त्यांना यामुळे अधिक सुलभता येणार आहे. त्यामुळे सरकारच्या बाजूने विषय मांडले जात असताना ते विरोधी पक्षाची बाजू अतिशय समर्थपणे मांडतील, असेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.नवीन सरकार राज्यातील जनतेसाठी जे जे चांगले काम करेल त्याला अजित पवार यांचे सहकार्य नक्कीच लाभेल. त्याप्रमाणेच कणखर विरोधी पक्ष नेता म्हणून विरोधी पक्षांच्यावतीने सरकारकडे मागण्या मांडण्याचे काम आणि सोबत योग्य मार्गदर्शन करण्याचे काम ते करतील असेही पाटील म्हणाले.

















