पुढच्या निवडणुकीत २०० आमदार निवडून आणणार; बहुमत सिद्ध होताच मुख्यमंत्र्यांचे शिवसेनेला आव्हान

मुंबई नगरी टीम

मुंबई । अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मिळवलेल्या विजयानंतर राज्यातील शिंदे सरकारने आज झालेला विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला.शिंदे सरकारने भाजप आणि शिंदे गटाचे आमदार,छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने बहुमत सिद्ध केले.भाजप आणि एकनाथ शिंदे युतीला एकूण १६४ मते मिळाली,तर महाविकास आघाडीला केवळ ९९ मते मिळाली.राज्यात शिंदे सरकार आल्याच्या अधिवेशनाच्या दुस-या दिवशी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी शिंदे गटात सामिल होण्याचा निर्णय घेत शिवसेनेला मोठा धक्का दिला.सध्या शिवसेनेचे आणि भाजपाचे १६५ आमदार असले तरी पुढील विधानसभा निवडणुकीत २०० आमदार निवडून आणणार असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून शिवसेनेला आव्हान दिले.

दोन दिवसाच्या विशेष अधिवेशनात काल झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राज्यातील शिंदे सरकारचे राहुल नार्वेकर विजयी झाल्यानंतर आज झालेल्या बहुमत चाचणीत शिंदे सरकारने बहुमत सिद्ध केले.काल रविवारी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे सरकारच्या बाजूने १६४ तर विरोधात १०७ मते पडली होती.मात्र आज झालेल्या बहुमत चाचणीत महाविकास आघाडीचे संख्याबळ ८ मतांनी घटले असल्याचे स्पष्ट झाले.बहुमत चाचणीत शिंदे सरकारच्या बाजूने १६४ तर विरोधात ९९ सदस्यांनी मतदान केले, तर ३ सदस्य तटस्थ राहिले.समाजवादी पक्षाचे अबू आझमी,रईस शेख आणि एम.आय.एम पक्षाचे आमदार फारूख अन्वर शाह हे तटस्थ राहिले.शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभु यांनी महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करण्याचा,तर एकनाथ शिंदे गटाचे पक्ष प्रतोद भरत गोगावले यांनी भाजप आणि शिंदे गटाला मतदान करण्यासाठी पक्षादेश काढला होता.बहुमताच्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही आमदार अनुपस्थित होते.भाजप आणि एकनाथ शिंदे समर्थक आमदार यांनी बहुमताचा आकडा पार केल्यावर विजयी गटाच्या आमदारांनी सभागृहात भारतमाताचा विजय असो, वन्दे मातरम्,छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विजय असो, जय श्रीराम अशा घोषणा दिल्या.

विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सभागृहात केलेल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करीत तुफान फटकेबाजी केली.देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत एकाचाच शपथविधी होईल असे जाहीर केले होते.आणि सगळी माहिती असल्याने ते खूश होते.पण आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार घेतला आहे.त्यांचा आणि आमचा अजेंडा सारखाच आहे.भाजपचे ११५ आणि आमचे ५० असे मिळून १६५ आमदार झाले आहेत.आपल्या भाषणात अजित पवार म्हणाले होती की,शिवसेना सोडणारे आमदार पुन्हा निवडून येणार नाहीत.हाच धागा पकडत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, जे पूर्वी गेले ते विरोधी पक्षात गेले, हिंदुत्वाचा विरोध केला त्यांच्याकडे गेले.आम्ही हिंदुत्वाचा पुरस्कार कऱणाऱ्यांकडे गेलो आहे.त्यामुळे १६५ नाही तर आम्ही दोघे मिळून पुढील निवडणुकीत २०० आमदार निवडून आणणार असे सांगून त्यांनी एक प्रकारे शिवसेनेला आव्हान दिले.शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही असे बाळासाहेबांचे शब्द होते अशी आठवणही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी करून दिली.मी आणि दवेंद्र फडणवीस कधी भेटायचो हे आमच्याही लोकांना कळत नव्हते. सगळे झोपल्यावर मी फडणवीसांना भेटायला जायचो आणि सगळे उठायच्या अगोदर परत यायचो. एकनाथ शिंदे यांनी सभागृहात हा किस्सा सांगताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोक्याला हात लावला आणि सगळे उघड करू नका,असे फडणवीस म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.आपल्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे यांनी सभागृहात बंडखोरी करण्यामागची कहाणी सांगितली. एखादा आमदार किंवा खासदार नेहमी विरोधी पक्षाकडून सत्तेकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो. पण आम्ही सत्तेत असताना विचारांसाठी हे पाऊल उचलले. माझ्यासोबत आलेल्या पैकी आमदारांमध्ये अनेकजण मंत्री होते, स्वत:चे मंत्रीपद धोक्यात घालून ते माझ्यासोबत आले.त्यावेळी एका बाजूला मोठे नेते,बलाढ्य सरकार आणि यंत्रणा होती.तर दुसरीकडे माझ्यासारखा एक साधा बाळासाहेबांचा आणि आनद दिघे यांचा शिवसैनिक होता.जेव्हा आम्ही हा निर्णय घेतला तेव्हा कुणीही कुठे चाललो आहे,कशाला चाललो आहे.किती दिवसासाठी चाललो आहे हे विचारले नाही असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

बंडाच्या आदल्या दिवशी मी अस्वस्थ होतो.राज्यसभेसाठी मतदान झाले त्यावेळी मला जी वागणूक मिळाली,त्याचे साक्षीदार सर्व आमदार आहेत.पण बाळासाहेबांनी नेहमी सांगितले होते की, अन्यायाविरुद्ध न्याय मागण्यासाठी आपण बंड,उठाव केला पाहिजे. त्यानंतर मला काय झाले माहीत नाही,नंतर माझे धडाधडा फोन सुरू झाले.माझ्या फोननंतर सर्वजण येऊ लागले.यावेळी मला कुणीही काही विचारले नाही.मात्र मुख्यमंत्र्यांचा मला फोन आला. कुठे चालला आहात ? अशी विचारणा त्यांनी मला केली.माझे खच्चीकरण कसे झाले हे सुनील प्रभूंना माहीत आहे.मी एक शिवसैनिक आहे, काही व्हायचे ते होऊ दे,लढून शहीद झालो तरी चालेल पण आता माघार नाही.शिवसेना वाचवण्यासाठी शहीद झालो तरी चालेल, एकटा शहीद होईल पण बाकी सारे वाचतील.तुम्ही काहीही चिंता करू नका. तुमचे नुकसान होत आहे असे मला जेव्हा वाटेल त्यादिवशी तुमचे भवितव्य सुरक्षित करेन आणि जगाचा कायमचा निरोप घेऊन निघून जाईन, हे मी माझ्या आमदारांना सांगितले होते असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Previous articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक ; स्मृतीस्थळावर जाणार का ?
Next articleआता विधानसभेत कडवट शिवसैनिक “भाई” विरूद्ध आक्रमक “दादा” सामना रंगणार