मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक ; स्मृतीस्थळावर जाणार का ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । ३९ आमदार फोडून शिवसेनेला जबर धक्का देणारे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यांनतर दादर येथील शिवाजी पार्कवरील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होतील अशी चर्चा होती.मात्र सध्याची परिस्थिती पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांनी विधानभवनात जाण्यापूर्वी कुलाबा येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.तणावाची परिस्थिती निवळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्मृतीस्थळावर जाण्याची शक्यता आहे.

विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन आजपासून सुरु झाले.या अधिवेशनासाठी विधानभवनात जाण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुलाब्याच्या रिगल चौकातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी बंडखोर आमदार दीपक केसरकर,दादाजी भुसे, गुलाबराव पाटील,संजय राठोड, भरतशेठ गोगावले, प्रताप सरनाईक, संजय शिरसाठ उपस्थित होते.शिवसेनेचे तब्बल ३९ आमदार फोडून उद्धव ठाकरे यांना धक्का देणारे एकनाथ शिंदे यांनी गुवाहटीत असताना आपण मुंबईत दाखल झाल्यानंतर शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाणार असल्याचे सांगितले होते.दोनच दिवसापूर्वी शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यांनतर ते बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी जाण्याची शक्यता होती.मात्र सध्याची परिस्थिती पाहता त्यांनी स्मृतीस्थळावर जाण्याचा निर्णय अजून घेतला नाही. मात्र आज त्यांनी आमदारांसह कुलाबा येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले त्यांनतर त्यांनी विधानभवन गाठले.

राज्यात हिंदुत्वाचे सरकार आले असून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारे सरकार स्थापन झाले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना सांगितले. राज्यात शिवसेना भाजपचे सरकार आले आहे. आतापर्यंत अनेकजण विरोधातून सत्तेत जातात.मात्र,आम्ही सत्तेतून विरोधात गेलो आहे. या घटनेची राज्यातच नव्हे तर देशातही याची नोंद होईल असे सांगून, माझ्यासोबत आठ ते नऊ मंत्रीदेखील सत्तेतून बाहेर पडले.एका बाजूला सत्ता,मोठी माणसे तर दुसऱ्या बाजूला बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा सामान्य कार्यकर्ता होता. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर ५० आमदारांनी विश्वास ठेवला हे माझे भाग्य समजतो असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Previous articleफडणवीसांना मुख्यमंत्री केलं नाही म्हणून भाजपाचे नेते ढसाढसा रडायला लागले… अजितदादांची तुफान बॅटिंग
Next articleपुढच्या निवडणुकीत २०० आमदार निवडून आणणार; बहुमत सिद्ध होताच मुख्यमंत्र्यांचे शिवसेनेला आव्हान