अखेर दिवस ठरला ! शिंदे-फडणवीस सरकारच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी केव्हा होणार ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली तरी अजून शिंदे-फडणवीस सरकारचा विस्तार झाला नसल्याने बंडखोर आमदार आणि भाजपचे आमदार यांचा जीव टांगणीला लागला असतानाच,शिंदे-फडणवीस सरकारचा विस्तार लवकरच होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेनेच्या आमदारांनी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केल्याने राज्यातील महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला होता.महाविकास आघाडीची सत्ता जाताच गेल्या आठवड्यात राजभवन येथे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला.या शपथविधीला पाच दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे.शिवाय विशेष अधिवेशनात बहुमत चाचणीत शिंदे-फडणवीस सरकारने बाजी मारली आहे. बहुमत चाचणी होताच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता होती.मात्र विस्तार काही झाला नाही.त्यामुळे सुरत-गुवाहटी आणि गोवा असा प्रवास केलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार,त्यांच्यासोबत असलेले अपक्ष आमदार आणि भाजपचे आमदार यांचा जीव टांगणीला लागला आहे.बंडखोरी केल्याने मतदार संघात नाराजीचे वातावरण आहे.त्यामुळे मंत्रिमंडळात वर्णी लागल्यास मतदार संघातील लोकांचा रोष कमी होण्यास मदत होईल असे बंडखोरांचे मत आहे.या मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे बंडखोर आमदारांसह भाजपच्या आमदारांचे लक्ष लागून राहिले असतानाच मंत्रिमडळ विस्तार नक्की केव्हा होणार याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे ४० बंडखोर आमदार आहेत तसेच काही अपक्ष आमदार आहेत.पक्षा विरोधात मोठा निर्णय घेतल्याने या सर्वांनाच आपल्या पदरात काहीना काही पडणार यांची अपेक्षा आहे.भाजपमध्येही मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या आहे.भाजपातील नेत्यांना नाराज न करता शिंदे गटातील आमदारांना मंत्रिपदे देण्याचे मोठे आव्हान भाजपासमोर आहे.त्यामुळे नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांमधिल घडामोजींमुळे मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात बैठक घ्यायला वेळ मिळाला नाही.काल आमची बहुमत चाचणी झाली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बरेच दिवस ठाण्याला गेले नव्हते आणि मीही नागपूरला आलो नव्हतो.त्यामुळे ज्यांनी आपल्याला निवडून दिले आहे, त्यांचे आभार मानल्याशिवाय काम सुरू करायचे कस ? असा सवाल करून,उद्या किंवा परवा विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी बैठक घेवून फॉर्म्युला ठरविण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी देवून विस्तार केव्हा होणार हे स्पष्ट केले आहे.

Previous articleउपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचा माईक खेचला,पुढे काय काय खेचतील ते माहीत नाही
Next articleमोदी सरकारचा नवा नारा ‘न खाने दूँगा और न पकाने दूँगा’ : नाना पटोलेंचा हल्लाबोल