मुंबई नगरी टीम
मुंबई । राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीसाठी राज्यातील एकूण २८७ आमदारांपैकी एकूण २८३ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला.शिवसेनेचे शिंदे गटाचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप हे मतदानासाठी अनुस्थित होते.राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे कारागृहात असल्याने मतदान करू शकले नाहीत.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात मतदान पार पडले.मतदानास सकाळी दहा वाजता सुरूवात झाली. शिंदे गटाचे आमदार आणि भाजपचे आमदार एकत्रित मतदानासाठी विधानभवनात आले होते.या निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजपच्या उमेदवार दौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला होता. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा जाहीर केला होता.या निवडणुकीसाठी राज्यातील एकूण २८७ आमदारांपैकी २८३ आमदारांनी मतदान केले.तर ४ आमदार विविध कारणांनी मतदानास गैरहजर राहिले.गंभीर आजाराशी झुंज देत असलेल्या भाजपच्या मुक्ता टिळक यांनी मतदान केले तर भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप हे मतदानास गैरहजर राहिले.शिंदे गटाचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी गुन्हा दाखल असल्याने कायदेशीर बाबीमुळे मतदानास येवू शकले नाहीत.राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे कारागृहात असल्याने मतदान करू शकले नाहीत.राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पक्षादेश नसल्याने आणि गुप्त मतदान पद्धत असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मते फुटतील असा दावा भाजपच्या नेत्यांनी करीत राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीप्रमाणे राष्ट्रपती निवडणुकीत देखील चमत्कार होणार असल्याचे सांगितले.