एकदाचं ठरलं ! येत्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार ? भाजपला २५ तर शिंदे गटाला १५ मंत्रिपदे

मुंबई नगरी टीम

मुंबई । एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होवून २८ दिवसांचा कालावधी उलटून गेला असला तरी मंत्रिमंडळचा विस्तार रखडला आहे.शिंदे सरकारच्या या रखडलेल्या विस्तारावरून विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली असतानाच आता शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या २ किंवा ३ ऑगस्टला होण्याची दाट शक्यता आहे.शिवाय मंत्रिमंडळ विस्तारात ४०-६० असा फॉर्म्युला ठरल्याचेही सांगण्यात येते.

गेल्या ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.शिंदे-फडणवीस यांच्या शपथविधीनंतर लगेच विस्तार केला जाण्याची शक्यता होती.मात्र शिवसेनेकडून शिंदे गटात गेलेल्या १६ आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आल्याने विस्तार लांबणीवर पडला होता.सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शिंदे गट आणि शिवसेनेला २७ जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.यात महत्वाचे मुद्दे असून यावर मोठ्या खंडपीठाची गरज भासू शकते,असे सांगत १ ऑगस्टला पुढील सुनावणी होईल असे खंडपीठाने सांगितले आहे.येत्या १ ऑगस्ट रोजी होणा-या या सुनावणीमुळे विस्तार लांबल्याची चर्चा होती.शिवाय सत्तेतील शिंदे गट आणि भाजपच्या वाट्यावरून हा विस्तार रखडल्याची चर्चा असतानाच विस्तार येत्या २ किंवा ३ ऑगस्टला होणार असल्याचे सांगण्यात येते.या विस्तारात शिंदे गटाला ४० टक्के तर भाजपला ६० टक्के वाटा मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यानुसार भाजपला २५ तर शिंदे गटाला १५ मंत्रिपदे मिळणार असल्याचे सांगण्यात येते.

भाजप आणि शिंदे गटाला अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला असल्याने या विस्तारात भाजप आणि शिंदे गटाकडून काही अपक्षांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील ९ मंत्र्यांनी शिवसेनेतून शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला.त्यामधिल उदय सामंत,संदिपान भुमरे, गुलाबराव पाटील,दादा भुसे, शंभूराज देसाई,अब्दुल सत्तार यांच्यासह बच्चू कडू,राजेंद्र पाटील यड्रावकर यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते.भाजपकडून चंद्रकांत पाटील,सुदीर मुनगंटीवार, गिरीश महाजन यांचे मंत्रिमंडळातील स्थान पक्के असल्याचे मानले जात आहे.शिवाय भाजपकडून नव्या चेह-यांना मोठ्या प्रमाणात संधी दिली जाणार असल्याची देखिल चर्चा आहे.

Previous articleसरकार स्थापन होवूनही विस्तार का होत नाही ? शरद पवांरानी शेलक्या शब्दात घेतला समाचार
Next articleमुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार ! आदित्य ठाकरेंच्या टीकेला उत्तर देण्यासाठी नाशिक औरंगाबाद दौ-यावर