मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार ! आदित्य ठाकरेंच्या टीकेला उत्तर देण्यासाठी नाशिक औरंगाबाद दौ-यावर

मुंबई नगरी टीम

मुंबई । युवा सेनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांचा नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यांच्या दौरा करणार आहेत.या दौ-यात ते त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांच्या मतदार संघात शक्तीप्रदर्शन करीत मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील गळती थांबविण्यासाठी आणि पक्ष मजबूतीसाठी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मुंबईत निष्ठा यात्रा तर ठाणे,नाशिक,अहमदनगर आणि औरंगबाद जिल्ह्यात शिव संवाद यात्रा काढून संभाव्य बंडखोरी थोपवली होती.या दौ-यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर कठोर शब्दात टीकास्त्र सोडले होते.आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जावून वातावरण निर्मिती केली होती.त्यांच्या या दौ-यामुळे बंडखोर आमदारांमध्ये धास्तीचे वातावरण होते.याच पार्श्वभूमीवर बंडखोर आमदारांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे मैदानात उतरले असून,आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला जशास तसे उत्तर देण्याची शक्यता आहे.शनिवार ३० जुलै रोजी मालेगाव येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विविध विकासकामांबाबत आढावा बैठक होईल. तसेच त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री औरंगाबादकडे रवाना होणार असून तेथे त्यांचा मुक्काम असणार आहे.रविवार ३१ जुलै रोजी औरंगाबाद येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक होईल. तसेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या विकासकामांचे लोकार्पण,उद्घाटन, भूमिपूजन आदी कार्यक्रम होतील.

Previous articleएकदाचं ठरलं ! येत्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार ? भाजपला २५ तर शिंदे गटाला १५ मंत्रिपदे
Next articleमुंबईत बसून उंटावरुन शेळ्या हाकणाऱ्यांना शेतातील अडचणी काय कळणार ? अजितदादांचा टोला