मुंबई नगरी टीम
सासवड । काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राहिलो असतो,तर आमचा एकही आमदार निवडून आला नसता, मी माझ्या मतदारसंघात एवढे काम केले आहे की,मला निवडून यायला कुठलीही निशाणी लागत नाही असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देत बंडखोरीची कारणे सांगून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातील आमदारांच्या मतदार संघात दौ-यांचा सपाटा लावला आहे.नाशिक औरंगाबाद नंतर त्यांनी आज पुणे जिल्ह्याचा दौरा केला.माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या पुरंदर मतदार संघात त्यांनी जाहीर सभेत बंडखोरीची कारणे सांगून शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.इतरांना भेटायला माझ्याकडे वेळ होता.मात्र बाकी कुणाकडे भेटायला वेळ नव्हता असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राहिलो असतो, तर आमच्याकडे असलेला एकही आमदार निवडून आला नसता असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.मी माझ्या मतदारसंघात एवढे काम केले आहे की,मला निवडून यायला कुठलीही निशाणी लागत नाही असा दावाही त्यांनी यावेळी केला.महाविकास आघाडीच्या काळात शिवसैनिकांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली.त्यांना अडीच वर्षात कुणीही विचारले नाही अशी भावना सर्वसामान्य शिवसैनिकांची होती.महाविकास आघाडीचे सरकार असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना चार नंबरवर फेकली गेली.मात्र राज्यात शिवसेना भाजपाचे सरकार आले असते,तर आज काँग्रेस-राष्ट्रवादी औषधालाही उरली नसती, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
गेल्या अडीच वर्षात ज्या शिवसैनिकांनी त्रास भोगला आहे असे सांगतानाच यापुढे एकाही शिवसैनिकाच्या केसाला धक्का लागला जाणार नाही असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सरकार आणायला पाहिजे होते ते आम्ही केले आहे.त्यामुळे विश्वासघात कुणी केला, आम्ही केला का, हे राज्यातील जनताच ठरवेल,असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.उठाव करताना थोडे जरी मागे पुढे झाले असते तर आमचा कार्यक्रमच झाला असता.काही लोकांना वाटले होते की,आम्ही राजकीय आत्महत्या केली आहे .आम्ही बंडखोर गद्दार असतो तर तुम्ही येथे एवढ्या ऊनात येथे आला असता का असा सवालही त्यांनी केला.