मुंबई नगरी टीम
मुंबई । पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधानभवनाच्या पाय-यावर आंदोलन करीत शिंदे- फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.ओला दुष्काळ जाहीर करा.अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा,ईडी सरकार हाय हाय,या सरकारचं करायचं काय,खाली डोकं वर पाय,आले रे आले ५० खोके आले,खोके घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो,स्थगिती सरकार हाय हाय,महाराष्ट्राशी गद्दारी,सत्तेत आली शिंदेची स्वारी,आले रे आले गद्दार आले.अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीतील पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली.पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाने शिंदे -फडणवीस सरकारला धारेवर धरले.विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पाय-यावंर शिंदे -फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत आक्रमकपणे सरकार विरोधात लढणार असल्याचे स्पष्ट केले.यावेळी विरोधकांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.सभागृहाच्या कामकाजाला सुरूवात होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांचा परिचय करून दिला.राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांची तर उपराष्ट्रपतीपदी जगदीप धनकड यांची निवड झाल्याबद्दल सभागृहाच्यावतीने अबिनंदन करण्यात आले.विविध अध्यादेश पटलावर ठेवण्यात आल्यावर सभागृहात पुरववण्या मागण्या सादर करण्यात आल्या.एकूण सात शासकीय विधेयके सादर करण्यात आले.विधानसभेत सहा माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शोकप्रस्ताव मांडला.माजी सदस्य भरतभाऊ नारायणभाऊ बहेकर,बाबुराव काशिनाथ पाचर्णे,जनार्दन दत्तुआप्पा बोंद्रे,नानासाहेब शांताराम माने,रावसाहेब पांडुरंग हाडोळे, उद्धवराव अंताराम शिंगाडे यांना विधानसभेत आदरांजली वाहण्यात आली.