दहशतवाद आणि ब्लॅकमेलिंग हा भाजपाचा मुख्य व्यवसाय : नाना पटोलेंचा हल्लाबोल

मुंबई नगरी टीम

मुंबई । ईडी,सीबीआय,इन्कम टॅक्स सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांची भीती घालण्याचा प्रकार भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने केला जात आहे. मागील सात-आठ वर्षातील भाजपा नेत्यांची विधाने पाहिली तर विरोधकांना घाबरवण्यासाठी, त्यांचा आवाज बंद करण्यासाठी ते कारवायांच्या धमक्या देत असतात.भाजपाचा आता दहशतवाद आणि ब्लॅकमेलिंग हा मूख्य व्यवसाय झाला आहे परंतु लोकशाहीत हे फार काळ टिकणार नाही, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, दहशत,भय आणि भूक या सर्व गोष्टी घेऊन केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे. त्यांना कधी ना कधी त्यांची जागा पाहायला मिळणार आहे. इंग्रजांनी हुकूमशाही कारभार केला त्याला जनता घाबरली नाही आता स्वंतत्र भारतात भाजपा इंग्रजांच्या पावलावर पाऊल टाकत त्याच पद्धतीने कारभार करू पहात पण ते आता शक्य नाही. महाविकास आघाडीचे सरकार पाडतानाही भाजपाकडून याच पद्धतीचा अवलंब केला. भाजपाने कारवाईच्या कितीही धमक्या दिल्या तरी महाविकास आघाडीचे नेते अशा धमक्यांना घाबरणार नाहीत.विरोधी पक्ष या नात्याने आम्ही जनतेचे प्रश्न मांडत आहोत त्यावर सरकारकडे उत्तर नाही म्हणून विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांच्या नावाने धमक्या देऊन विरोधकांना घाबरवण्याचे राजकारण केले जात आहे. ईडी सरकारची उलटी गिनती सुरु झाली असून जनतेचे प्रश्न आम्ही उपस्थित करत राहू, असेही पटोले म्हणाले.

वैनगंगा नदीच्या कोपामुळे भंडारा जिल्ह्यातील जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे. शिवारात पाणी साचल्याने धान पीक सडण्याच्या मार्गावर आहे. मोहाडी, लाखांदूर, पवनी या तालुक्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. येथे त्वरित मदतकार्य पोहोचवण्यात यावी अशी नाना पटोले यांनी विधानसभेत केली.अतिवृष्टीमुळे राज्यात गोंदिया, भंडारा, गडचिरोली भागात पाणी साचले आहे, घरे पडली आहेत, शेती उद्धवस्त झाली आहे, अन्नदाता अडचणीत आला आहे त्यावर चर्चा झाली पाहिजे. यावर सरकारला निवेदन करण्याचे आदेश द्यावेत असे पटोले म्हणाले.

Previous articleमहाराष्ट्राशी गद्दारी,सत्तेत आली शिंदेची स्वारी : विरोधकांची जोरदार घोषणाबाजी
Next articleमोठी बातमी : विनायक मेटे यांच्या अपघाताची सीआयडी मार्फत चौकशी