उद्धवजी..दीड वर्षाच्या बाळाला भाषणात खेचणं तुमच्या धगधगत्या हिंदुत्वात बसतं का ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांवर हल्लाबोल करीत शिंदेवर घराणेशाहीचा टीका केली.या टीकेवर मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून एका दीड वर्षाच्या अजाण बाळाला आपल्या भाषणात खेचणं तुमच्या धगधगत्या हिंदुत्वात बसतं का ? असा खरमरीत सवाल केला आहे.

शिवसेनेच्या फुटीनंतर प्रथम होणा-या शिवाजी पार्कवर होणा-या शिवसेनेच्या तर बीकेसीच्या मैदानावर शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले होते.शिवाजी पार्कवर झालेल्या मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांवर हल्लाबोल केला.या भाषणात त्यांनी शिंदे घराणेशाहीला लक्ष्य करीत, बाप मुख्यमंत्री मुलगा खासदार आता नातवाल त्यांना नगरसेवक करायचे आहे अशी टीका केली होती.उद्धव ठाकरे यांच्या या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.तुम्ही तुमच्या मेळाव्याची जाहिरात काय केली होतीत ? धगधगत्या हिंदुत्वाचे विचार ऐका वगैरे.कालच्या सभेत तुम्ही हिंदुत्वाचे काय विचार ऐकवलेत ते फक्त तुम्हालाच ठाऊक.मला तुम्हाला फक्त इतकंच विचारायचं आहे की, एका दीड वर्षाच्या अजाण बाळाला आपल्या भाषणात खेचणं तुमच्या धगधगत्या हिंदुत्वात बसतं का ? असा सवाल त्यांनी आपल्या पत्रातून उद्धव ठाकरे यांना केला आहे.

काल उभ्या महाराष्ट्रानं काय पाहिलं ? काय ऐकलं ? महाराष्ट्रानं जे पाहिलं आणि तुमच्या तोंडून जे ऐकलं त्याची दखल घेऊन अत्यंत व्यथित मनानं आज तुम्हाला हे पत्र लिहीत आहे.हे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘खासदार मुलाचं नाही तर हे पत्र आहे रुद्रांश श्रीकांत शिंदे या दीड वर्षाच्या निरागस,चिमुकल्याच्या बापाचं,राजकीय भूमिका मांडणं,प्रतिस्पर्ध्यावर टीका करणं हे राजकारणात होणारच.त्यावर माझा आक्षेप नाहीच,तुम्ही तुमच्या मेळाव्याची जाहिरात काय केली होतीत ? धगधगत्या हिंदुत्वाचे विचार ऐका वगैरे.कालच्या सभेत तुम्ही हिंदुत्वाचे काय विचार ऐकवलेत ते फक्त तुम्हालाच ठाऊक.मला तुम्हाला फक्त इतकंच विचारायचं आहे की,एका दीड वर्षाच्या अजाण बाळाला आपल्या भाषणात खेचणं तुमच्या धगधगत्या हिंदुत्वात बसतं का ? उद्धवजी,तुम्हाला आठवतंय का तुम्ही काल काय बोललात ते? उद्धवजी तुम्हाला आठवतंय का माझ्या मुलाचा रुद्रांशचा उल्लेख तुम्ही कसा केलात ते ? माझा उल्लेख तुम्ही कार्टं असा केलात.ठीक आहे,तुमच्या कुवतीनुसार तुम्ही बोललात म्हणून सोडून दिलं आम्ही.माझ्या रुद्रांशचा उल्लेख करून,त्याचा नगरसेवकपदावर डोळा आहे असं वक्तव्य केलंत.ज्या डोळ्यांत फक्त आणि फक्त निरागसता भरलेली आहे, ज्या डोळ्यांतून केवळ आणि केवळ निर्मलता ओसंडून वाहाते आहे, असे डोळे खुर्चीकडे लागलेले आहेत, असं वक्तव्य करताना तुम्हाला काहीच वाटलं नाही ? मुख्यमंत्री असताना स्वतःला कुटुंबप्रमुख म्हणवत होतात ना ? मग कुटुंबप्रमुख असा कोवळ्या जिवांचा बाजार मांडणारा असतो ? कुठे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कुठे तुम्ही. बाळासाहेबही विरोधकांवर जळजळीत टीका करायचे, पण त्यांनी असली हीन व गलिच्छ टिप्पणी कधीही केली नाही असेही त्यांनी या पत्रातून सुनावले.

तुम्ही काल जे बोललात ते ऐकून बाळाची आई व आजी दोघी कमालीच्या दुखावल्या आहेत. धास्तावल्या आहेत.डोळ्यांत अश्रू दाटून आले त्यांच्या ज्या चिमुकल्याचं दुडूदुडू चालणं, त्याचं बोबडं बोलणं, हसणं-खिदळणं हे देवाचं देणं आहे अशी आपली श्रद्धा आहे, त्याच्याविषयी एक राजकारणी माणूस असं कसं काय बोलू शकतो, हा प्रश्न त्यांना पडलेला आहे त्याचं उत्तर माझ्याकडे नाही. तुमच्याकडे आहे ? माजी मुख्यमंत्र्याच्या तोंडी ही असली भाषा ? अहो, पद वगैरे जाऊ द्या. कुठलाही सुसंस्कृत माणूस, संवेदनशील माणूस असं बोलू शकतो ? बोलणं सोडाच, असा विचार करू शकतो ? मनाला किती वेदना देणारं आहे आणि या पत्रात जी वेदना मी मांडली आहे तीच भावना राज्यातील प्रत्येक बापाची असणार यात मला तरी शंका नाही. ज्या परिवारासाठी आम्ही जीवाचं रान केलं. त्याच कुटुंबातली एक प्रमुख व्यक्ती जर आमच्या चिमुकल्याबद्दल असे उद्गार काढत असेल तर आमच्या मनाला किती वेदना होत असतील.तुम्ही पातळी सोडलेली असली तरी आम्ही सोडलेली नाही आणि सोडणारही नाही.तुम्हीही पुढच्या काळात आजोबा व्हाल.तुमच्या लाडक्या नातवाचं,नातीचं कौतुक कराल.त्यांच्या डोळ्यांतील निरागसता पाहून तुमचंही मन आनंदानं भरून जाईल.मात्र त्या तुमच्या नातवाबद्दल, नातीबद्दल तुम्ही जे काल बोललात तसं कुणी बोललं तर काय अवस्था होईल तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांची. देव करो नि तसं त्यांच्याबद्दल कुणीही न बोलो, ही माझी- एका बापाची मनापासूनची सदिच्छा आहे. एकच लक्षात ठेवा, पोटच्या बाळावर जिवापाड माया करणाऱ्या आईचा शाप सगळ्यांत धारधार असतो, आणि बाळासाठी वाट्टेल ते करणाऱ्या हिरकणीचा हा महाराष्ट्र आहे. त्या हिरकणीचा अंश अजूनही सगळीकडे आहे असा इशाराही त्यांनी या पत्रातून उद्धव ठाकरे यांना दिला.

Previous articleशिंदे गटाच्या मेळाव्यावर करोडोची उधळपट्टी; ईडी इन्कम टॅक्सकडून चौकशी करण्याची मागणी
Next articleबीकेसीवरील मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वाचली भारतीय जनता पक्षाची स्क्रिप्ट