मुंबई नगरी टीम
मुंबई । दिवाळी सणानिमित्त राज्यातील शिधापत्रिका धारकांना १ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ किलो साखर व १ लिटर पामतेल या चार वस्तू केवळ शंभर रूपयांत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती.मात्र दिवाळीला दोन दिवस बाकी असतानाही या योजनेची प्रत्यक्षात अंमलबजाणी करण्यात येत नसल्याने विरोधी पक्षांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.विरोधकांच्या टीकेनंतर पुरवठा विभागाला जाग आली असून १९ व २० ऑक्टोंबरपर्यंत या चारही वस्तू जिल्हापातळीवर सर्व रेशनिंग दुकानांवर पोहचविण्यात येतील व त्यानंतर या वस्तूंचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.
सरकारने सर्वसामान्यांची दिवाळी चांगली जावी यासाठी १ किलो साखर,१ किलो रवा, एक किलो चनाडाळ आणि एक लिटर तेल केवळ १०० रुपयांत देण्याचा निर्णय घेतला आहे.याचा फायदा राज्यातील १ लाख ६२ हजार शिधापत्रिका धारकांना म्हणजेच ७ कोटी लोकांना होणार आहे.मात्र दिवाळी जवळ आलेली असताना याचे वितरण नेमके कसे केले जाणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नव्हते. त्यामुळे विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले होते.दिवाळीला दोनच दिवस बाकी असताना या पॅकेजचे वाटप सुरू झाले नसल्याने सर्वसामान्य जनतेत नाराजी होती.विरोधकांनी हा मुद्दा लावून धरल्याने अखेर पुरवठा विभागाला जाग आली असून,१९ व २० ऑक्टोंबर पर्यंत या चारही वस्तू जिल्हापातळीवर सर्व रेशनिंग दुकानांवर पोहचविण्यात येतील व त्यानंतर या वस्तूंचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज राज्यातील विभागाच्या अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून आढावा बैठक घेतली.दिवाळीपूर्वी चार वस्तूंचा शिधाजिन्नस संच हा पात्र शिधावाटप पत्रिकाधारकांपर्यंत योग्य पध्दतीने लवकरात लवकर कसा वितरीत होईल याचे नियोजन करा,असे निर्देश यावेळी चव्हाण यांनी दिले.
राज्यातील अंत्योदय अन्न योजनेतील २५ लाख,प्राधान्य कुटूंबातील १.३७ कोटी व औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा जिल्हयांतील केशरी मधील सुमारे ९ लाख शिधावाटप पत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका १ शिधाजिन्नस संच वितरित करण्यात येणार आहे.असे एकूण १ कोटी ७१ लाख एवढ्या शिधापत्रिकाधारकांना सदर शिधाजिन्नस संच वितरित करण्यात येणार आहे.सदर शिधाजिन्नस संच पात्र शिधापत्रिकाधारकांना ई- पॉस प्रणालीद्वारे १०० रुपयात दिवाळीसाठीच्या सवलत दराने वितरित करण्यात येणार आहे,असेही त्यांनी स्पष्ट केले. दिवाळी सणानिमित्त १ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ किलो साखर व १ लिटर पामतेल या चार वस्तू प्रत्यक्षात वेगवेगळ्या ठिकाणांवरुन रेशनिंग दुकानांपर्यंत अथवा रेशनिंग गोदामात पोहोचणार आहेत.आणि, शिधावाटप धारकांना त्यांचे एकत्रित वितरण केले जाणार आहे. या योजनेचा लाभ अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील शिधावाटप पत्रिका धारकांना तसेच पात्र केशरी, शेतकरी शिधावाटप पत्रिका धारकांना दिवाळी निमित्त या योजनेचा लाभ मिळणार आहे, असेही मंत्री चव्हाण यांनी सांगितले.